सध्या जगभरात एका घटनेने सर्वांना हादरवून सोडलंय. ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेला गोळीबार. अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणूक शर्यतीत आघाडीवर असलेले माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी प्रचारादरम्यान गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. हल्लेखोर त्यांचाच समर्थक होता. हल्ल्यात ट्रम्प यांच्या कानाला गोळी चाटून गेल्याने ते थोडक्यात वाचले. ट्रम्प यांच्यावर जो हल्ला झाला त्यावर अभिनेत्री आणि खासदार झालेली कंगना रणौतने तिची प्रतिक्रिया नोंदवली आहे.
कंगना ट्रम्प हल्ल्यावर काय म्हणाली?
कंगना रणौतने ट्रम्प यांच्यावर जो हल्ला झाला त्यावर सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. कंगनाने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करुन लिहिलंय की, “ट्रम्प यांना त्यांच्या रॅलीत गोळ्या घातल्या गेल्या. त्यांच्यावर जो हत्येचा प्रयत्न झाला त्यातून ते थोडक्यात बचावले. पण यामुळे डावे लोक चांगलेच हतबल होत आहेत… प्रत्येकाने सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. गोळीबार झाल्यानंतर हा ८० वर्षांचा माणूस पहिल्यांदा ओरडतो 'हेल अमेरिका' ही निवडणूक जिंकेल. ही उजवी बाजू आहे. कधीही लढा सुरू करू नका, परंतु हा लढा बंद करणारे व्हा.”
अमेरिकेसाठी ट्र्म्प यांनी छातीवर गोळी झेलली: कंगना
पुढे ट्रम्पचा फोटो शेअर करताना कंगना पुढे म्हणाली. “अमेरिकेसाठी ट्रम्प यांनी आपल्या छातीवर गोळी झेलली. जर त्यांनी बुलेट प्रूफ जॅकेट घातले नसते तर ते या हल्ल्याच्या प्रयत्नातून वाचले नसते. डाव्या विचारसरणीने मला कायमच आश्चर्यचकीत केलं आहे. उजव्यांबरोबर डाव्यांचा मुख्य विरोध हा हिंसेसाठी आहे. उजव्यांना धर्मासाठी लढा आवडतो. तर दुसरीकडे डावे मूलत: प्रेम आणि शांततेवर विश्वास ठेवतात. म्हणूनच काही जागृत डाव्यांनी ट्रम्प यांना मारण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून द्वेष आणि हिंसा जिंकू शकत नाही. खूप हुशार आणि खूप स्मार्ट.” अशी तिरकस टिपणी करत कंगनाने ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलेला दिसतोय.