Kangana Ranaut on Pathaan: कंगना राणौतचं ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू झालं आहे आणि पुन्हा एकदा तिच्या ट्विटची चर्चा सुरू झालीये. शाहरुख खानच्या पठाणनं जगभर धुमाकूळ घातला आहे. पण कंगनाला मात्र पठाणचं यश काही केल्या पचत नाहीये. पठाणच्या यशावर कंगनाने एक ना अनेक ट्विट्स केली आहेत. आता तिचं ताजं ट्विटही चर्चेत आहे.
निर्माती प्रिया गुप्ता यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात पठाणचं स्क्रीनिंग सुरु असताना प्रेक्षक चित्रपटगृहांत थिरकताना दिसत आहेत. प्रिया गुप्ता यांनी हा व्हिडीओ शेअर करत आपलं मत नोंदवलं आहे. हे सिद्ध करतं की, हिंदू मुस्लिम शाहरूख खानवर समान रूपाने प्रेम करतात. बायकॉट मोहिम चित्रपटाचं नुकसान करत नाही तर उलट याने फायदाच होतो. भारत सुपर सेक्युलर आहे, असं त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं. प्रिया गुप्ता यांचा हा व्हिडिओ रिट्विट करत कंगनाने नवं ट्विट केलं आहे.
काय म्हणाली कंगना?
"खूप चांगलं विश्लेषण... या देशाने फक्त आणि फक्त सर्व खानांवर प्रेम केलं आहे आणि काही वेळा फक्त आणि फक्त खानांवरच प्रेम केलं आहे... मुस्लिम अभिनेत्रींवरही लोकांनी वेड्यासारखं प्रेम केलंय, त्यामुळे भारतावर द्वेष आणि फॅसिझमचा आरोप करणे अत्यंत अयोग्य आहे... जगात संपूर्ण भारतासारखा देश नाही.." असं खोचक ट्विट कंगनाने केलंय.आता कंगनाच्या या ट्विट चाहते प्रतिक्रिया तर देणारच. कंगनाच्या या विधानानंतर अनेकांनी तिची चांगलीच शाळा घेतलीये. "असं नाहीये ताई... या देशानं हृतिक रोशनवरही प्रेम केलंय", असं एका युजरने लिहिलं आहे. "तुला दुसरं काही काम नाही, दिवसभर बकवास करतेस", अशा शब्दांत एका युजरने तिला सुनावलं आहे. "तुला फक्त द्वेष पसरवता येतो", अशी कमेंट अन्य एका युजरने केली आहे. "ज्याच्याकडे प्रतिभा असते, त्याला धर्म, जात, वंश, पंथ, रंगावर बोलण्याची गरज पडत नाही. या देशात जया, रेखा, माधुरी दीक्षित, मनीषा कोयराला, जुही चावला अशा अभिनेत्रींवर सुद्धा प्रेम केलंय" असंही एकाने म्हटलं आहे.कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच तिला इमरजन्सी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमात तिने भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. येत्या २० ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.