सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड आला आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. केवळ बॉलिवूड कलाकारांच्याच जीवनावर नव्हे तर राजकारणांच्या जीवनावर देखील चित्रपट बनवले जात आहेत. संजू या संजय दत्तच्या बायोपिकला तर प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता प्रेक्षकांना जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात जयललिता यांची भूमिका बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत साकारणार आहे.
कंगनाने नुकतेच मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटानंतर आता कंगना पुन्हा एकदा बायोपिक मध्ये काम करताना दिसणार आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. फिल्म ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट मध्ये लिहिले आहे की, कंगना राणौत लवकरच तुम्हाला जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट दोन भाषेत बनवला जाणार आहे. हिंदीत जया तर तामिळ भाषेत थलाईवी असे चित्रपटाचे नाव असणार आहे. एएल विजय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून कवी विजयेंद्र प्रसाद यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. विजयेंद्र प्रसाद यांनी बाहुबली आणि मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी सारखे प्रसिद्ध चित्रपट लिहिले आहेत तर चित्रपटाची निर्मिती विष्णू वर्धन इंदुरी आणि शैलेश आर सिंह करणार आहेत.
जयललिता या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. अभिनयात मिळालेल्या यशानंतर त्या राजकारणाकडे वळल्या. त्यांनी तेलगू, कन्नड तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या 1991 पासून 2016 पर्यंत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांचे निधन 2016 मध्ये झाले.
कंगणाचा आज वाढदिवस असून तिच्या चाहत्यांना मिळालेली ही वाढदिवसाची भेटच आहे असे म्हणावे लागेल. २३ मार्च १९८७ रोजी हिमाचल प्रदेशमधील मनालीजवळील एका छोट्याशा गावात कंगनाचा जन्म झाला. बालपणी कंगनाचा ग्लॅमर दुनियेशी कोणताच संबंध नव्हता. कंगनाचे वडील अमरदीप व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आई आशा शिक्षिका आहे. कंगनाचे बालपण डेहरादूनमध्ये गेले. तेथेच डीएव्ही हायस्कूलमधून कंगनाने आपले शिक्षण पूर्ण केले.