लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अभिनेत्री कंगना रणाैत हिने मानहानीच्या कारवाईला स्थगिती देण्यासाठी केलेली याचिका म्हणजे वेळकाढूपणा आहे, असे प्रसिद्ध गीतकार व तक्रारदार जावेद अख्तर यांनी उच्च न्यायालयाला मंगळवारी सांगितले.
जावेद अख्तर यांनी केलेल्या मानहानी दाव्यासह आपण केलेल्या तक्रारीचीही सुनावणी घेण्यात याव्यात, अशी मागणी करणारी याचिका कंगनाने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत अख्तर यांनी दाखल केलेल्या दाव्यावरील सुनावणीला स्थगिती द्यावी, अशी विनंती कंगनाने न्यायालयाला केली आहे. कंगनाची ही याचिका फेटाळावी, अशी विनंती अख्तर यांनी केली आहे.
याचिकेनुसार, कंगनाने केलेली तक्रार आणि अख्तर यांच्या दाव्यावरील सुनावणी एकत्रित घ्यावी. कारण दोघांमध्ये २०१६ मध्ये झालेल्या बैठकीची माहिती तिने केलेल्या तक्रारीत आहे. दंडाधिकारी यांनी दिलेल्या एकाही आदेशाला कंगनाने आव्हान दिलेले नाही. कोणतेही ठोस कारण न देता तिने कारवाईवर स्थगिती मागितली आहे, असे अख्तर यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. न्या. रेवती मोहिते -डेरे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे याचिका सुनावणीला आल्यावर न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी एकलपीठापुढे घेण्याचे निर्देश दिले.