कंगना राणौतने ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते. आता कंगना निर्मिती क्षेत्रात डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. होय, कंगनाने ‘मणिकर्णिका’ या नावाने एक प्रॉडक्शन हाऊस उघडले आहे. तिच्या या प्रॉडक्शन हाऊसच्या पहिल्या चित्रपटाची तयारी जोरात सुरु आहे. होय, ‘अपराजित अयोध्या’ हा कंगनाच्या होम प्रॉडक्शनचा पहिला चित्रपट असणार आहे.
स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, हा चित्रपट अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावर आधारित असेल. पुढील वर्षी या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल. के व्ही विजेन्द्र प्रसाद यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. के व्ही विजेन्द्र प्रसाद हे ‘बाहुबली’ सीरिजचे क्रिएटर आहेत.या चित्रपटाबद्दल सांगताना कंगना म्हणाली की, राम मंदिराचा मुद्दा अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. या मुद्याने भारतीय राजकारणाचा चेहरा बदलला. नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने हा वाद संपुष्टात आला. याच मुद्याशी निगडीत चित्रपट मी निवडला. हा चित्रपट वेगळा आहे, कारण हा चित्रपट एका हिरोच्या नास्तिक ते आस्तिक बनण्यापर्यंतचा प्रवास मांडतो. माझ्या प्रॉडक्शन हाऊससाठी यापेक्षा चांगला विषय मिळाला नसता, असे माझे मत आहे.
सध्या कंगना ‘थलायवी’ या चित्रपटात बिझी आहे. हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे जयललितांच्या आयुष्यावर आधारित आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक विजय या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. तमिळ, तेलुगू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये 26 जून 2020 ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
जयललितांच्या या बायोपिकसाठी कंगनाने प्रोस्थेटिक मेकअपची मदत घेतली आहे. हा मेकअप खूप जड असतो. तसेच हा मेकअप सांभाळणे कलाकरांसाठी एक टास्क असतो. या सिनेमासाठी ती भरतनाट्यम आणि तमिळ भाषा सुद्धा शिकली. जयललिता यांच्या बायोपिकसाठी कंगनाने 20 कोटी रुपयांचे मानधन घेतल्याची चर्चा आहे.