Join us  

रवीना टंडनवर झालेल्या खोट्या आरोपांवर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, "ही धोक्याची घंटा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 10:39 AM

रवीना टंडनला परवा रात्री जमावाने घेरले. तिच्यावर आणि ड्रायव्हरवर एका वृद्ध महिलेला धडक दिल्याचा आरोप होता.

अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) एका वादात अडकली होती. परवा रात्री अभिनेत्रीला आणि तिच्या ड्रायव्हरला मारहाण झाली. त्यांच्यावर एका वृद्ध महिलेवर गाडी चढवल्याचा आणि त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. रवीनाने नशेतच त्या वृद्ध महिलेला आणि तिच्या कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप झाला. मात्र या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून आलं. या प्रकरणावर कंगना रणौत (Kangana Ranaut)  नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.

कंगना रणौतने इन्स्टाग्रावर स्टोरी शेअर करत लिहिले, "रवीनासोबत जे झालं ती धोक्याची घंटा आहे. तिच्या विरोधात जर आणखी ५-६ लोक असते तर तिला त्यांनी ठारच मारलं असतं. रस्त्यावरील अशा प्रकारच्या उद्रेकाचा निषेध केला पाहिजे. अशा लोकांना फटकारलं पाहिजे. अशा प्रकारे विचित्र आणि हिंसक वर्तन करणाऱ्यांना अजिबातच सोडलं नाही पाहिजे."

मुंबईपोलिसांनी या प्रकरणाची सत्यता पडताळल्यानंतर सांगितले की, "रवीनाच्या कारने कोणालाही धडक दिलेली नव्हती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतील व्यक्ती रवीनावर त्याच्या आईला धडक दिल्याचा आरोप करताना दिसत आहे. तसंच रवीनाने त्याला धमकावल्याचाही त्याने दावा केला. रवीनाच्या घराजवळून तो त्याची आई, बहीण आणि भाचीसोबत जात असताना हा प्रकार घडला असं तो म्हणताना दिसत आहे. मात्र सीसीटीव्ही तपासल्यानंतर लक्षात आलं की महिलेला धडक बसलीच नव्हती. रवीना कारबाहेर आली असता तिला उलट जमावाने धक्का दिला. ती सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करत होती. 

ही घटना बांद्रा येथील कार्टर रोड परिसरात घडली. या प्रकरणी कोणतीही FIR रजिस्टर झालेली नाही. रवीना नशेत नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :कंगना राणौतरवीना टंडनबॉलिवूडमुंबईपोलिसलीचिंग