बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत लोकसभा निवडणुकीमुळे चर्चेत आली आहे. कंगना हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणुक लढवणार आहे. बॉलिवूड गाजवल्यानंतर आता कंगना राजकीय क्षेत्रात उतरली आहे. अभिनयाबरोबरच कंगना अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादही होत असतात. आताही कंगनाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल केलेल्या विधानाने नवा वादाला तोंड फुटलं होतं.
"नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताचे पहिले पंतप्रधान होते", असं कंगानाने एका मुलाखतीत म्हटलं होतं. तिच्या या वक्तव्यानंतर कंगनाला ट्रोल करण्यात आलं होतं. यावर कंगनाने आता Xवरुन ट्वीट करत ट्रोलर्सला उत्तर देत तिच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. कंगनाने तिच्या ट्वीटमध्ये एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. फोटो शेअर करत ती म्हणते, "जे लोक मला भारताच्या पहिल्या पंतप्रधानांबद्दल ज्ञान देत आहेत, त्यांनी आधी हा स्क्रीनशॉट वाचा. हे काही लोकांसाठी सामान्य ज्ञान आहे. काही प्रतिभावान लोक मला शिकण्यासाठी बोलत आहेत. त्यांना मी सांगू इच्छिते की मी एमर्जन्सी नावाचा सिनेमा लिहिला आहे. त्यात मी अभिनय आणि दिग्दर्शनही केलं आहे. त्या सिनेमाची कथा नेहरू कुटुंबीयांवर आधारित आहे. जेव्हा मी तुमच्या IQ पेक्षा जास्त बोलते...तेव्हा तुम्हाला वाटतं की मला या गोष्टी माहीत नाहीत. त्यामुळे खिल्ली तुमचीच उडाली आहे आणि ती पण खूप वाईट पद्धतीने...".
कंगनाने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये काय?
कंगनाने एक न्यूज आर्टिकल शेअर केलं आहे. त्यामध्ये "२१ ऑक्टोबर १९४३ रोजी स्वतंत्रता सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूरमध्ये आजाद हिंद सरकार स्थापन केलं. दुसऱ्या महायुद्धादरम्यान सुभाषचंद्र बोस यांनी स्वत:ला प्रधानमंत्री, राज्य प्रमुख आणि युद्ध मंत्री घोषित केलं होतं", असं म्हटलं गेलं आहे.
"सुभाषचंद्र बोस भारताचे पहिले पंतप्रधान" नेमकं काय म्हणाली कंगना?
"मला आधी एक गोष्ट स्पष्ट करु द्या की भारताचे पहिले प्रधानमंत्री सुभाषचंद्र बोस कुठे गेले?", असं कंगना म्हणाली होती.