बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि पत्रकारातील भांडण तूर्तास तरी मिटण्याची चिन्हे नाहीत. या वादानंतर एकीकडे एंटरटेनमेंट जर्नलिस्ट गिल्ड ऑफ इंडिया या संघटनेने कंगना राणौतवरचा बहिष्कार कायम राहील, असे जाहीर केले. तर दुसरीकडे कंगनाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत मीडिया आणि पत्रकारांवर निशाणा साधला. मीडियाला विकाऊ आणि देशद्रोही म्हणायलाही ती कचरली नाही. पण आता तर कंगनाने तिच्या वकिलांमार्फत पत्रकारांना थेट नोटिस पाठवली आहे.
कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी एंटरटेनमेंट जर्नलिस्ट गिल्ड ऑफ इंडिया या संघटनेला नोटिस पाठवत त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या नोटिसमध्ये काही पत्रकार काहीही कारण नसताना कंगनाची बदनामी करत असल्याचे म्हटले आहे. या नोटिसमध्ये अनप्रोफेशनल जर्नालिस्ट असे देखील पत्रकारांना म्हणण्यात आले आहे. तसेच या नोटिसमध्ये म्हटले आहे की, काही ज्येष्ठ आणि आपल्या कामाप्रती निष्ठा राखणारे पत्रकार त्या दिवशी काय घडले त्याबाबत माहीत नसताना देखील उगाचच इतर पत्रकांरांना पाठिंबा देत आहेत. तसेच ही संघटना रजिर्स्टड देखील नसून अनेकजण या संघटनेत प्रवेश घेत आहेत आणि चुकीच्या गोष्टीना पाठिंबा देत आहेत. खरे तर या चुकीच्या गोष्टींवर त्यांनी आवाज उठवणे गरजेचे होते.
कंगनाचा ‘जजमेंटल है क्या’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत कंगना एका पत्रकारासोबत जोरदार भांडली. पीटीआय वृत्तसंस्थेचे पत्रकार जस्टीन राव यांनी पत्रकार परिषदेत कंगनाला प्रश्न विचारला. पण प्रश्न विचारण्याआधी त्यांनी आपले नाव तिला सांगितले. त्यांचे नाव ऐकून कंगनाला तिच्याबद्दल लिहिलेली एक बातमी आठवली. ‘मणिकर्णिका’च्या प्रदर्शनावेळी तिच्याबद्दल ही बातमी लिहिण्यात आली होती. मग काय, क्षणात कंगनाचा पारा चढला आणि तिने पत्रकारावर हल्लाबोल केला. ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या वेळी माझ्याबद्दल जाणीपूर्वक खोट्या बातम्या लिहिल्या गेल्यात. माझ्याविरोधात खोट्या गोष्टी ट्वीट केल्या गेल्यात, असा आरोप तिने त्यांच्यावर केला होता.