Join us

Kangana Ranaut: “गांधींनी कधीही भगतसिंग, नेताजींना पाठिंबा दिला नाही, थप्पड खाऊन स्वातंत्र्य मिळत नाही”: कंगना रणौत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 9:58 PM

Kangana Ranaut: कंगनाच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवरील मेसेजसनंतर पुन्हा नवा वाद निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे.

नवी दिल्ली: आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळाले, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या बॉलिवूड क्विन कंगना रणौत (Kangana Ranaut) विरोधात देशभरातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, तरीही कंगना रणौत थांबलेली नाही. आता कंगना रणौतने महात्मा गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पाठिंबा दिला नाही. थपडा खाऊन स्वातंत्र्य मिळत नाही, असे कंगनाने म्हटले आहे. कंगनाच्या या विधानानंतर पुन्हा नवा वाद निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. 

कंगना रणौतने इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक न्यूज कटिंग आणि दोन मोठे संदेश पोस्ट केले आहेत. यामध्ये कंगनाने आपल्या आधीच्या विधानाबाबत भूमिका मांडली आहे. पहिल्या मेसेजमध्ये कंगना म्हणते की, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्यांना सत्तेच्या भुकेल्या आणि धूर्त लोकांनी त्यांच्या मालकांच्या स्वाधीन केले होते. हे तेच लोक होते ज्यांनी त्यांचे शोषण केले. यांच्यात लढण्याची हिंमत नव्हती किंवा त्यांचे रक्तही उसळले नाही. हेच लोक आम्हाला शिकवतात, जर तुम्हाला कोणी थप्पड मारली तर दुसर्‍या गालावर दुसरी थप्पड खा आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. पण कोणालाही असे स्वातंत्र्य मिळत नाही. अशा प्रकारे फक्त भीक मिळते. म्हणून आपले आदर्श हुशारीने निवडा, असे कंगनाने म्हटले आहे. 

गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही

इन्स्टाग्राम स्टोरीजवर दुसऱ्या मेसेजमध्ये कंगना रणौत म्हणते की, गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना समर्थन दिले नाही. भगतसिंगच्या फाशीला गांधींचा पाठिंबा होता, असे बरेच पुरावे आहेत. यामुळे कोणाचे समर्थन करावे हे तुम्ही ठरवले पाहिजे. कारण या सर्व गोष्टी मनात ठेवून त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणे पुरेसे नाही. खरे तर हे मौन अतिशय बेजबाबदार आणि वरवरचे आहे. प्रत्येकाला त्यांचा इतिहास आणि आदर्शाबद्दल माहिती असणं आवश्यक आहे, असे कंगनाने म्हटले आहे. 

विक्रम गोखलेंनी केले कंगनाचे समर्थन

कंगनाला पाठिंबा देत विक्रम गोखले म्हणाले होते की, कंगना बोलली ते अगदी खर आहे. मी तिच्या वक्तव्याचे समर्थन करतो. कोणाच्या मदतीने स्वातंत्र्य मिळालेले नाही. ते भिकेतच मिळाले आहे. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते, तेव्हा फाशीपासून त्यांना वाचवले नाही, हे चुकीचे आहे, अशी भूमिका मांडत हा देश कधीही हिरवा होणार नाही. हा देश भगवा राहिला पाहिजे. जे ७० वर्षात झाले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, पक्षाचे काम सर्व करतात, पण ते देशासाठी चांगले काम करतायत, असे विक्रम गोखले यांनी म्हटले होते. 

दरम्यान, गेल्या आठवड्यात अभिनेत्री कंगना राणावतच्या एका वक्तव्यावरून मोठा वाद झाला होता. भारताला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले. पूर्वी मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नव्हते तर भीक मागून मिळाले होते, असे वक्तव्य कंगनाने एका कार्यक्रमात केले होते. यावरून देशभरात संतापाची लाट उसळली असून, अनेकांनी कंगनावर घणाघाती टीका केली. इतकेच नव्हे तर, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कंगनाला दिलेला पद्म पुरस्कार काढून घ्यावा. तिला अटक करावी, अशी मागणी केली आहे.  

टॅग्स :कंगना राणौतमहात्मा गांधीनेताजी सुभाषचंद्र बोसभगतसिंगइन्स्टाग्राम