सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड सिनेमांचीच हवा असल्याचं पाहायला मिळतो. 'पठाण', 'गदर २' आणि 'जवान' या चित्रपटांमुळे बॉक्स ऑफिसला अच्छे दिन आले आहेत. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर पुन्हा बॉलिवूडचं राज्य आल्याचं चित्र आहे. 'गदर २' आणि 'जवान'च्या यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने हिंदी फिल्म इंडस्ट्रीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
'टाइम्स नाऊ भारत'ला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने 'गदर २' आणि 'जवान'च्या यशाबाबत भाष्य केलं. ती म्हणाली, "एक इंडस्ट्री म्हणून आम्ही एकत्र आहोत. दाक्षिणात्य इंडस्ट्री आणि आम्ही सगळे एकत्र आहोत. सनी देओलसारखे कलाकार बऱ्याच काळापासून स्पर्धेतही नव्हते. आपल्याला अशा कलाकारांची गरज आहे."
कंगनाने या मुलाखतीत कलाकारांच्या मानधनाबाबतही भाष्य केलं. "बॉलिवूडमध्ये अजूनही अभिनेत्यांना अभिनेत्रींपेक्षा जास्त मानधन मिळतं. मी माझ्या अटींवर काम करते. महिलांवर आधारित चित्रपट बनवण्याची मोहीम मी सुरू केली आहे. त्यानंतर आता मोठ्या पडद्यापासून ओटीटीपर्यंत सगळीकडेच महिलांवर आधारित चित्रपट येत आहेत," असं कंगना म्हणाली.
कंगना 'चंद्रमुखी २', 'तेजस' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगनाचा 'एमर्जन्सी' हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.