उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये(Hathras Case) झालेल्या गॅंगरेपवरून देशभरातील जनता संतापली आहे. १९ वर्षाच्या तरूणीवर निर्दयीपणे अत्याचार केल्यावर तिचा मृत्यू झाला. या घटनेने पुन्हा एकदा निर्भया प्रकरणाच्या वेदनादायी आठवणी ताज्या झाल्या. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही हाथरसमधील घटनेवर राग व्यक्त केलाय. कंगनाने तर गुन्हेगारांना सर्वांसमोर गोळ्या झाडून मारण्याची मागणी केली होती. एकीकडे काही लोक योगी आदित्यनाथांचा राजीनामा मागत असताना आता कंगनाने यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी ट्विट करून त्यांच्यावर विश्वास दर्शवला आहे.
कंगनाने ट्विट केलं की, 'मला योगी आदित्यनाथजी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ज्याप्रकारे त्यांनी प्रियंका रेड्डीच्या बलात्काऱ्यांना त्याच जागेवर मारलं जिथे त्यांनी बलात्कार केला होता आणि प्रियंकाला जिवंत जाळलं होतं. आमची इच्छा आहे की, तसाच भावनापूर्ण, स्वाभाविक आणि आवेशपूर्ण न्याय हाथरस घटनेत मिळावा'.
याआधी कंगनाने ट्विट केलं होतं की, बलात्कार करणाऱ्यांना सर्वांसमोर गोळ्या झाडून मारलं पाहिजे. दरवर्षी वाढणाऱ्या या गॅंगरेपचं अखेर समाधान काय आहे? देशासाठी फार लाजेची आणि दु:खाची बाब आहे. आम्हाला दु:खं आहे की, मुलींसाठी काही करू शकलो नाहीत.
तेच दुसरीकडे अभिनेत्री स्वरा भास्करने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. स्वराने ट्विट केले की, उत्तर प्रदेशात बलात्काराची महामारी पसरली आहे. हाथरस केस केवळ एक उदाहरण आहे.
१४ सप्टेंबरला सामूहिक बलात्कार
हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. प्रथम अलिगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नंतर सोमवारी तिला दिल्लीला हलविण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले होते की, घटनेच्या वेळी या मुलीचा गळा दाबण्यात आला. अलिगडच्या हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या मुलीचे पाय पूर्णपणे निष्क्रिय झाले होते आणि हातालाही लकवा झाला होता. या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, संदीप, रामू, लवकुश आणि रवी, अशी आरोपींची नावे आहेत.