वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत येणारी कंगना रणौत (kangana ranaut) सध्या तिच्या इमर्जन्सी (Emergency) या चित्रपटामुळे चर्चेत येत आहे. आतापर्यंत या चित्रपटातील अनेक भूमिकांवरील पडदा दूर सारण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता कमालीची वाढत असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदेसोबत आणखी एक मराठमोळा अभिनेता झळकणार असून त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
अलिकडेच या चित्रपटातील महिमा चौधरीचा (mahima chaudhari) लूक रिव्हिल करण्यात आला. त्याच्यानंतर आणखी एका भूमिकेवरील पडदा दूर झाला आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर या अभिनेत्याचा फोटो शेअर केला आहे. कंगनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेता मिलिंद सोमण दिसत असून तो या चित्रपटात 1971 मधील भारत-पाकिस्तान युद्धातील सॅम मानेकशॉ (sam manekshaw) यांची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे सॅम मानेक शॉ यांच्या लूकमध्ये असलेल्या मिलिंदला ओळखणंही कठीण असल्याचं दिसून येतं.
यापूर्वी इमर्जन्सी या चित्रपटाचे चार पोस्टर प्रदर्शित झाले. तसंच काही भूमिकांवरील पडदाही दूर झाला. त्यानुसार, या चित्रपटात अनुपम खेर (anupam kher), श्रेयस तळपदे (shreyas talpade), महिमा चौधरी (mahima chaudhary) हे कलाकार झळकणार आहे.
दरम्यान, या चित्रपटामध्ये अनुपम खेर, जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर श्रेयस तळपदे अटल बिहारी वाजपेयींची भूमिका साकारणार आहे. तसंच महिमा चौधरी, पुपुल जयकर यांच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तर कंगना स्वत: या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.