दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून अभिनेत्री कंगना राणौत सतत चर्चेत आहे. आता याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कंगनाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. मला बलात्कार व जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे तिने या व्हिडीओत म्हटले आहे. शिवाय शेतकरी आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचा दावाही तिने केला आहे. गेल्या 10-15 दिवसांपासून मला ऑनलाईन लिचिंगचा सामना करावा लागतोय. पण या देशाला काही प्रश्न विचारणे हा माझाही हक्क आहे. पीएम मोदी यांनी सर्व काही स्पष्ट केल्यानंतर कोणत्याही शंकेला वाव नाही. असे असताना (शेतकरी) आंदोलन राजकीय प्रेरित आहे, हे अगदी स्पष्ट आहे. कुठे ना कुठे या आंदोलनात दहशतवाद्यांनीही भाग घेतला आहे. मला दहशतवादी, देशात फूट पाडण्यांबद्दल तक्रार नाही. माझी खरी तक्रार तुमच्याबद्दल आहे. तुम्ही लोक इतक्या सहजपणे या लोकांच्या बोलण्यात कसे येता? त्यांच्या इशाºयावर कसे नाचता? या दहशतवाद्यांसमोर स्वत: इतके दुबळे का ठरता? असा सवाल तिने या व्हिडीओत केले आहे.
माझ्यावर संशय घेता, प्रियंका-दिलजीतवर का नाही?मी काही बोलले की, माझ्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. प्रियंका चोप्रा व दिलजीत दोसांज यांच्या मनसुब्यांवर असे प्रश्न का उपस्थित केले जात नाहीत? मी राजकारण करते, असे आरोप माझ्यावर होता. हे काय करत आहेत, यांना का विचारले जात नाही? असेही कंगना म्हणाली.
कंगना आणि दिलजीत दोसांज यांच्यामध्ये मागील काही दिवसांत शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन वाद सुरु आहे. एकीकडे कंगना शेतकरी आंदोलनाला विरोध करत आहे. तर दुसरीकडे दिलजीत मात्र शेतक-यांना पाठिंबा देत कंगनावर सातत्यानं निशाणा साधत आहे. दिलजीत शेतक-यांना भडकवण्याचा प्रयत्न करतोय, असा आरोप कंगनाने अलीकडे केला होता. कंगनाच्या या आरोपाला उत्तर देताना, शेतकरी तुला दहशतवादी वाटतात का? असा सवाल दिलजीतने केला होता.