अभिनेत्री कंगना रणौत ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. कंगना नुकतीच हिमाचल प्रदेशातील मंडी भागातील निवडणूक जिंकून खासदार झाली आहे. खासदार झाल्यावर कंगना एका प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली. ते म्हणजे, काल चंदीगढ एअरपोर्टवर CISF जवान महिलेने कंगनाच्या कानशिलात लगावली. त्यामुळे हे प्रकरण चांगलंच वाढलं. पुढे त्या जवान महिलेला सस्पेंड करण्यात आलं. या सर्व प्रकरणावर कंगनाची बहिण रंगोली चंडेलने संताप व्यक्त केलाय.
खलिस्तानी म्हणत कंगनाच्या बहिणीचा संताप
कंगनाची बहिण रंगोली चंडेलने सोशल मीडियावर इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याविषयी संताप व्यक्त केलाय. ती लिहिते, 'खलिस्तानी माणसांनो तुमची हीच पात्रता आहे. मागून प्लॅन करुन हल्ला करणं इतकंच तुम्हाला जमतं. पण माझी बहिण ताठ कण्याची आहे. कंगनाने एकटीनेच हे सर्व प्रकरण हाताळलं. पण पंजाब तुमचं काय होणार. शेतकरी आंदोलन हा खलिस्तानी माणसांचा अड्डा होता. ही गोष्ट पुन्हा सिद्ध झाली. हा गंभीर सुरक्षेचा धोका आहे.'
निलंबन करुन काही होणार नाही: रंगोली
ज्या CISF जवान महिलेने कंगनाच्या कानशिलात लगावली तिला पुढे सस्पेंड करण्यात आलं. याच मुद्द्यावर बोट ठेवून रंगोलीने पुढे लिहिलं की, 'तिला सस्पेंड करुन जास्त फरक पडणार नाही. तिला खलिस्तानी लोकांकडून मोठी रक्कम मिळाली असेल. तिला रिमांडमध्ये घ्यावं लागेल.' अशाप्रकारे रंगोलीने कंगनाला झालेल्या मारहाणीबद्दल CISF जवान महिलेवर संताप व्यक्त केलाय.
कंगनाला कानशिलात लगावणारी महिला जवान बडतर्फ
'१०० रुपये घेऊन लोक शेतकरी आंदोलनात सहभागी झालेत', असं विधान कंगनाने केलं होतं. CISF महिला जवानाची आई शेतकरी आंदोलनात सहभागी झाली होती. कंगनाच्या विधानाने संतप्त झालेल्या महिला जवानाने तिच्या कानशिलात लगावली. गुरुवारी दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली. कंगना त्यावेळी चंदीगढ एअरपोर्टवरुन दिल्लीसाठी रवाना होत होती. याचदरम्यान ही घटना घडली. कंगनाने याविषयी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी महिला जवान कुलविंदर कौरवर मोठी कारवाई करत तिला सस्पेंड केलंय.