दीपिका पादुकोणचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'छपाक'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरची सगळीकडून खूप प्रशंसा होते आहे. छपाक चित्रपटात दीपिका अॅसिड अटॅक पीडित लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दीपिकाने साकारलेल्या पात्राचे नाव मालती आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजारने केले आहे. छपाकच्या ट्रेलरला खूप चांगला रिस्पॉन्स मिळत असून आता तर नेहमी सर्वांवर टीका करणारी कंगना रानौतची बहिण रंगोली हिनेदेखील दीपिकाचं कौतूक केलं आहे.
रंगोली हिने छपाकचा ट्रेलर ट्विटरवर शेअर करत लिहिले की, वॉव, प्रत्येकाने हा सिनेमा पाहिला पाहिजे. कमाल आहे.
दुसऱ्या ट्विटमध्ये तिने म्हटलं की, मेघना आणि दीपिका या चित्रपटातून खूप अश्रू कमविणार आहेत. माझं कुटुंब व मी या सर्व गोष्टींना सामोरे गेले आहे. जे काही आम्ही सोसले आहे ते मृत्यूपेक्षा कमी नव्हते. एका अॅसिड अटॅक सर्व्हाव्हरची कथा देशापर्यंत पोहचणे गरजेचं आहे. हे व्हावे म्हणून मी प्रार्थना करेन.
‘छपाक’च्या ट्रेलर लॉन्चवेळी दीपिका ढसाढसा रडू लागली. ‘छपाक’ची दिग्दर्शिका मेघना गुलजार हिने दीपिकाला स्टेजवर येण्याची विनंती करताच संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने भरून गेला. दीपिका स्टेजवर आली आणि तिला भावना अनावर झाल्यात. यानंतर दीपिकाने कसेबसे स्वत:ला सावरले. ‘मी जेव्हा जेव्हा हा ट्रेलर पाहते तेव्हा तेव्हा मला अश्रू अनावर होतात. आपल्या देशात आपण पीडितांना चांगली वागणूक देत नाही, त्यांना गुन्हेगारासारखे वागवले जाते, असेही ती म्हणाली.