कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ या नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटाने आत्तापर्यंत ७६.६५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारणाऱ्या कंगनावर कौतुकाचा वर्षाव होतोय. या चित्रपटाद्वारे कंगनाने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे, त्याचीही चर्चा होतेय. पण याहीपेक्षा चर्चा आहे ती या चित्रपटाने निर्माण केलेल्या वादाची. होय, मणिकर्णिकाचे सहदिग्दर्शक क्रिश आणि कंगनातील आरोप-प्रत्यारोप अद्यापही थांबलेले नाहीत. पण आता हा वाद बॉलिवूडपर्यंत येऊन पोहोचलाय.
‘इंडस्ट्रीने कायम माझ्याकडे दुर्लक्ष केलेय. माझ्या मुव्ही ट्रायलमध्ये कुणीही येत नाही. पण त्यांची वेळ येते तेव्हा लाजलज्जा सोडून मला फोन करतात आणि बोलवतात.अलीकडे मी सुद्धा त्यांच्या चित्रपटांच्या स्क्रिनिंगला जाणे सोडले आहे. आलियाने मला ‘राजी’चा ट्रेलर पाठवत, तो बघण्याची विनंती केली होती. हा ट्रेलर पाहिल्यानंतर मी मेघना गुलजार आणि आलिया दोघींनाही स्वत:हून फोन केला. पण माझ्या चित्रपटाबद्दल मात्र त्यांच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही. आमिरनेही मला ‘दंगल’ आणि ‘सीक्रेट सुपरस्टार’साठी फोन केला होता. आमिर खान व ट्विंकल खन्ना महिला सक्षमीकरणावर तासन् तास बोलतात. पण मणिकर्णिकासारखा ऐतिहासिक संदर्भ असलेल्या चित्रपटावर त्यांची साध्या एका ओळीचीही प्रतिक्रिया आली नाही. माझ्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी त्यांच्याजवळ वेळ नव्हता. हे सगळे लोक संधीसाधूू आहेत. हे सगळे माझ्याविरोधात कटकारस्थान रचतात,’असे कंगना म्हणाली.