Join us

चंदीगढ विमानतळावर जे घडलं त्यानंतर कंगनाचा बॉलिवूडवर हल्ला, Rafah चा उल्लेख करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 1:21 PM

कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत बॉलिवूडवर नाराजी व्यक्त केली.

Kangana Ranaut slapped : अभिनेत्री आणि मंडी लोकसभेची खासदार कंगना रणौत हिच्यासोबत अत्यंत हैरान करणारी घटना घडली.  कंगना चंदीगढ एअरपोर्टवरुन दिल्लीसाठी रवाना होत होती. याचदरम्यान CISF महिला जवानाने बेसावध असलेल्या कंगनाच्या कानशिलात लगावली. या घटनेनंतर मोठी खळबळ बघायला मिळतंय. मोठा संताप व्यक्त केला जातोय.  अनेक राजकीय व्यक्तींनी कंगनाला पाठिंबा देत या घटनेचा निषेध व्यक्त केला.  कंगना रणौतने पाठींब्याबद्दल आभार मानले, पण तिच्यावर झालेल्या हल्ल्यानंतरही बॉलिवूड गप्प राहिल्याने नाराजी व्यक्त केली.

कंगनावर झालेल्या हल्ल्यानंतर अभिनेत्रीच्या बाजूने बोलण्याची तसदी एक-दोन व्यक्ती वगळता इतर कोणीही घेतली नाही. यावर कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत बॉलिवूडवर नाराजी व्यक्त केली. तसेच ज्यांनी 'All Eyes on Rafah' अशा पोस्ट केल्या होत्या, त्यांच्यावर राग व्यक्त केला. मात्र, ही पोस्ट नंतर कंगना राणौतच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून काढून टाकण्यात आली. मात्र त्याचे काही स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. यात कंगनाने लिहलं, 'प्रिय फिल्म इंडस्ट्री, विमानतळावर माझ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर तुम्ही सर्वजण एकतर आनंद साजरा करत आहात किंवा पूर्णपणे शांत बसला आहात'.

पुढे तिनं लिहलं, 'पण एक गोष्ट लक्षात ठेवा... उद्या जेव्हा तुम्ही तुमच्या देशात किंवा जगात कुठेही फिरत असाल आणि मग अचानक एखादा इस्रायली किंवा पॅलेस्टिनी तुमच्यावर आणि तुमच्या मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल. कारण, तुम्ही रफावर झालेल्या इस्रायली हल्ल्याचा विरोध केला होता. तेव्हा मी तुमच्या हक्कांसाठी लढताना दिसेल. आज मी ज्या ठिकाणी आहे, तिथे मी का आहे, असा प्रश्न जर तुम्हाला कधी पडला. तर लक्षात ठेवा की, तुमच्यात कोणीही माझ्यासारखं नाही'.

कंगनाने दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'लवकरच 'इमर्जन्सी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये आपल्या विश्वासू आणि गणवेश परिधान केलेल्या सुरक्षा रक्षकांनी एका नि:शस्त्र महिलेला तिच्याच घरात कसं मारलं हे दाखवलं जाईल. एका वृद्ध महिलेला मारण्यासाठी 35 गोळ्या वापरल्या. शूर खलिस्तानींची ही कहाणी लवकरच प्रदर्शित होणार आहे'.

दरम्यान कंगनावर हल्ला करणाऱ्या CISF महिला जवानाला निलंबित करण्यात आलं आहे. या CISF महिला जवानाचं नाव कुलविंदर कौर (kulwinder kaur) असं आहे. गेल्या २ वर्षांपासून ती चंदीगढ विमानतळावर तैनात असून ती शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. मध्यंतरी कंगनाने शेतकरी आंदोलनाविषयी एक भाष्य केलं होतं. दिल्लीतील शेतकरी १००-२०० रुपयांसाठी आंदोलनात सहभागी होतायेत, असं विधान कंगनाने केलं होतं. या आंदोलकांमध्ये कुलविंदरची आईदेखील सहभागी होती. त्यामुळे कंगनाने केलेल्या या विधानाचा राग कुलविंदरच्या मनात होता. ज्यामुळे रागाच्या भरात तिने कंगनाला पाहिल्यावर तिच्यावर हात उचलला. 

टॅग्स :कंगना राणौतसेलिब्रिटीबॉलिवूडचंडीगढ़हिमाचल प्रदेशशेतकरी आंदोलन