Video : देशाला उद्धवस्त करणारे तुम्ही मला काय उद्धवस्त करणार? कंगना राणौत मीडियावर भडकली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 11:26 AM2019-07-11T11:26:24+5:302019-07-11T12:29:59+5:30
एकीकडे एंटरटेनमेंट जर्नलिस्ट गिल्ड ऑफ इंडिया या संघटनेने कंगना राणौतवरचा बहिष्कार कायम राहिल, असे जाहीर केले. तर दुसरीकडे कंगनाने एक व्हिडीओ जारी करत मीडिया आणि पत्रकारांवर निशाणा साधला.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि पत्रकारातील भांडण तूर्तास तरी मिटण्याची चिन्हे नाहीत. या वादानंतर एकीकडे एंटरटेनमेंट जर्नलिस्ट गिल्ड ऑफ इंडिया या संघटनेने कंगना राणौतवरचा बहिष्कार कायम राहिल, असे जाहीर केले. तर दुसरीकडे कंगनाने एक व्हिडीओ जारी करत मीडिया आणि पत्रकारांवर निशाणा साधला. मीडियाला विकाऊ आणि देशद्रोही म्हणायलाही ती कचरली नाही.
कंगनाची बहीण रंगोली हिने आपल्या सोशल अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात कंगना मीडियावर आगपाखड करताना दिसतेय. व्हिडीओच्या सुरुवातीला, कंगनाने मीडियातील काही लोकांचे आभार मानले आहेत. मीडियातील काही लोकांचा माझ्या यशात मोठा वाटा आहे, मी त्यांची कायम आभारी असेल, असे तिने म्हटले आहे. पण यानंतर मीडियातील एका विशिष्ट गटाला तिने लक्ष्य केले आहे.
Here’s a vidoe message from Kangana to all the media folks who have banned her, P.S she has got viral fever hence the heavy voice 🙂...(contd) pic.twitter.com/U1vkbgmGyq
— Rangoli Chandel (@Rangoli_A) July 11, 2019
मीडियाचा एक गट देशाची अस्मिता, एकतेवर हल्ला चढवतो, खोट्या अफवा पसरवतो. अशा दुटप्पी आणि काही पैशात विकल्या जाणा-या मीडियावर मी प्रहार करण्याचे धोरण स्वीकारले असल्याचे ती म्हणतेय. ती पुढे म्हणते, ‘हे लोक पत्रकार परिषदेत फुकटाचे खातात. तुम्हा लोकांना खरेदी करण्यासाठी लाखोंची गरज नाही. तुमच्यासारखे लोक 50-60 रूपयातही विकले जातात. देशाला उद्धवस्त करणारे तुम्ही लोक मला काय उद्धवस्त करणार? तुमच्यासारखे सडलेले पत्रकार आणि मुव्ही माफियांची चलती असती तर मी आज भारताची सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री नसती. मी तर तुम्हाला हात जोडून विनंती करेल की, मला बॅन करा. कारण माझ्यामुळे तुमच्या सारख्यांची चूल पेटावी, असे मला मुळीच वाटत नाही.’
(Contd)....🙏🏻🙏🏻🙏🏻 pic.twitter.com/nzQoVN8llU
— Rangoli Chandel (@Rangoli_A) July 11, 2019
ज्या पत्रकारासोबत कंगनाचे भांडण झाले होते, त्या पत्रकारालाही कंगनाने लक्ष्य केले. ‘अशाच एका ‘चिंदी’ पत्रकाराला मी भेटले होते. त्याने माझ्या प्रत्येक गोष्टीची टर उडवली. ती त्याच्या देशद्रोही प्रश्नांचे उत्तर देण्यास नकार दिला. यानंतर त्याने काही लोकांना हाताशी घेऊन एक गिल्ड बनवली. जिला ना मान्यता आहे, ना विचार. याद्वारे त्याने मला धमकावणे सुरु केले. माझ्यावर बॅन आणण्याची धमकी दिली,’ असे ती म्हणाली.
गत रविवारी ‘जजमेंटल है क्या’ च्या एका कार्यक्रमात कंगनाचा पीटीआयचा पत्रकार जस्टीन राव याच्यासोबत वाद झाला होता. जस्टीनने कंगनाला एक प्रश्न विचारला असता कंगना त्याच्यावर भडकली होती. त्यानंतर पत्रकार संघटनांनी कंगनावर टीका करत माफीची मागणी केली होती. मात्र कंगनाची बहिण रंगोली हिने कंगना माफी मागणार नसल्याचे सांगत त्या पत्रकाराला देशद्रोही व पैशासाठी हपापलेला म्हटले होते.