बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि पत्रकारातील भांडण तूर्तास तरी मिटण्याची चिन्हे नाहीत. या वादानंतर एकीकडे एंटरटेनमेंट जर्नलिस्ट गिल्ड ऑफ इंडिया या संघटनेने कंगना राणौतवरचा बहिष्कार कायम राहिल, असे जाहीर केले. तर दुसरीकडे कंगनाने एक व्हिडीओ जारी करत मीडिया आणि पत्रकारांवर निशाणा साधला. मीडियाला विकाऊ आणि देशद्रोही म्हणायलाही ती कचरली नाही.कंगनाची बहीण रंगोली हिने आपल्या सोशल अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात कंगना मीडियावर आगपाखड करताना दिसतेय. व्हिडीओच्या सुरुवातीला, कंगनाने मीडियातील काही लोकांचे आभार मानले आहेत. मीडियातील काही लोकांचा माझ्या यशात मोठा वाटा आहे, मी त्यांची कायम आभारी असेल, असे तिने म्हटले आहे. पण यानंतर मीडियातील एका विशिष्ट गटाला तिने लक्ष्य केले आहे.
मीडियाचा एक गट देशाची अस्मिता, एकतेवर हल्ला चढवतो, खोट्या अफवा पसरवतो. अशा दुटप्पी आणि काही पैशात विकल्या जाणा-या मीडियावर मी प्रहार करण्याचे धोरण स्वीकारले असल्याचे ती म्हणतेय. ती पुढे म्हणते, ‘हे लोक पत्रकार परिषदेत फुकटाचे खातात. तुम्हा लोकांना खरेदी करण्यासाठी लाखोंची गरज नाही. तुमच्यासारखे लोक 50-60 रूपयातही विकले जातात. देशाला उद्धवस्त करणारे तुम्ही लोक मला काय उद्धवस्त करणार? तुमच्यासारखे सडलेले पत्रकार आणि मुव्ही माफियांची चलती असती तर मी आज भारताची सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री नसती. मी तर तुम्हाला हात जोडून विनंती करेल की, मला बॅन करा. कारण माझ्यामुळे तुमच्या सारख्यांची चूल पेटावी, असे मला मुळीच वाटत नाही.’