२०२० हे वर्ष केवळ अभिनेत्री कंगना रणौतने केलेल्या वादग्रस्त विधानांसाठीच नाही तर तिच्या विरोधात होणाऱ्या कायदेशीर कारवाईसाठीही लक्षात ठेवलं जाईल. शेतकऱ्यांचा अपमान केल्यामुळे आधीच FIR दाखल झालेल्या कंगनाविरोधात आता धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल झाली आहे. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेलला समन्स पाठवण्यात आला आहे. दोघींना पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.
कंगनाचा मुंबई पोलिसांवर हल्ला
मुंबई पोलिसांच्या या समन्सवर कंगनाने आता प्रतिक्रिया दिली आहे. नेहमीप्रमाणे कंगनाने मुंबई पोलिसांची खिल्ली उडवली आहे. तिने मुंबई पोलिसांना पप्पूप्रो सेना असं म्हटलं आहे. तिने ट्विटमध्ये लिहिले की, 'किती पछाडलेली आहे ही पेंग्विन सेना. महाराष्ट्राचे पप्पूप्रो. फार आठवण येते क-क-क-क कंगना, काही हरकत नाही. लवकरच येईन'. कंगनाचं मुंबई पोलिसांना पप्पूप्रो म्हणणं नव्या वादाला तोंड फोडू शकतं. याआधी तिने सोनिया सेनासारख्या शब्दांचा वापर केला होता. (आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी, कंगना रनौतवर गुन्हा दाखल; कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांची १२ तासांच्या आत कारवाई)
काय आहे प्रकरण?
१७ ऑक्टोबरला कंगनाविरोधात कोर्टाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या चौकशीसाठी तिला मुबंई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करा, असे आदेश वांद्रे न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिले होते. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी कंगना राणौतने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाप्रकरणी वांद्रे कोर्टाने कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. (कंगना रणौतची टिवटिव सुरूच; आता म्हणे, लोकांनी बॉलिवूड हा शब्दच रिजेक्ट करावा!)
मुंबई पोलिसांना हे आदेश दिले होते. त्यानुसार बॉलिवूड अभिनेत्री कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरूद्ध वांद्रे पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. हा एफआयआर भादंवि कलम २९५(अ), १५३(अ) आणि १२४(अ) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. कास्टिंग डायरेक्टर साहिल अशरफ सय्यद यांच्या तक्रारीनंतर वांद्रे न्यायालयाने कंगना आणि तिच्या बहिणीविरूद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले होते.
हे सर्व कलम अजामीनपात्र आहेत, असे साहिलचे वकील रवीश जमींदार यांनी सांगितले होते. कोर्टाकडून आदेश मिळाल्यानंतर फिर्यादी व त्याचा वकील कोर्टाच्या आदेशाची प्रत घेऊन वांद्रे पोलिस ठाण्यात पोहोचले. एफआयआरनुसार कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांनी आपल्या ट्वीटद्वारे जातीय सलोखा बिघडविण्याची आणि महाराष्ट्र सरकारच्या नावाची बदनामी करण्याचे काम केले आहे.