इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) ताब्यात घेताच मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली. ब्लू टिक वापरकर्त्यांना प्रत्येक महिन्याला ८ डॉलर द्यावे लागणार असल्याची घोषणा इलॉन मस्क यांनी केली होती, आता या निर्णयाची अंबलबजावणी करण्यात आली असून आता ब्लू टिक हवी असणाऱ्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. मस्क यांच्या या निर्णयावर आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut ) हिने प्रतिक्रिया दिली आहे.
ट्विटरकडून कंगनाचं ट्विटर हँडल सस्पेन्ड करण्यात आलं आहे. ट्विटर इलॉन मस्क यांनी विकत घेतल्यानंतर कंगना ट्विटरवर परतणार अशा चर्चा सुरू झाल्या असताना कंगनाने मस्क यांच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने मस्क यांना पाठींबा दिला आहे.
काय म्हणाली कंगना....
ट्विटर एक उत्तम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. अर्थात मला यांची व्हेरिफिकेशन प्रोसेस कधीच समजली नाही. जी काही निवडक लोकांना मिळते, जणू काही अन्य लोकांचे कुठलेही व्हेरिफाईड अस्तित्वच नाही. उदाहरणार्थ मी व्हेरिफाईड आहे, पण माझ्या वडिलांना ब्लू टिक हवी असेल तर 3-4 जोकर त्यांची विनंती अमान्य करतात. जणू ते अवैधरित्या जगत आहे. व्हेरिफिकेशन हे आधारकार्डाच्या आधारावर व्हायला हवं. ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांना सहजरित्या वेरिफाईड श्रेणी मिळायला हवी. ट्विटरवर ब्लू टिक हवी असल्याच पैसे घेण्याचा निर्णय एकदम योग्य आहे. यामुळे प्लॅटफॉर्म आणखी सुधारण्यास मदत होईल. आपण मोफत वापरत असलेल्या सर्व प्लॅटफॉर्मबद्दल कधी विचार केला आहे का? ते स्वत:ला कसे टिकवून ठेवतात? ते डेटा विकतात, तुमच्यावर प्रभाव पाडतात. हे सर्व प्लॅटफॉर्म तुम्हाला मोफत सुविधा देणार असतील तर मग त्यांना पैसा कसा मिळणार? अशा परिस्थितीत ब्लू टिकसाठी पैसे घेण्याचा ट्विटरचा निर्णय अगदी योग्य आहे. यामुळे युजर्सला डेटा लीक सारख्या समस्यांपासूनही मुक्ती मिळेल आणि एक चांगला अनुभवही मिळेल, असंही कंगनाने म्हटलं. ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांनी आपल्या कंपनीतून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली, यावर मात्र कंगना काहीही बोलली नाही.