करण जोहर (Karan Johar) दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाची जोरदार चर्चा आहे. ७ वर्षांनंतर करण जोहरनेसिनेमा दिग्दर्शित केला आहे. सध्या सिनेमागृहात चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी होत आहे. तीन दिवसातच सिनेमाने ५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाच्या यशावर कंगना रणौतने (Kangana Ranaut) मात्र जोरदार टीका केली आहे. करण जोहर पेड पीआरच्या माध्यमातून आपल्या सिनेमाचे चांगले रिव्ह्यू छापून घेतो असा दावा तिने केलाय.
कंगनाने काल आपल्या इन्स्टाग्रामवर करण जोहरची एक जुनी मुलाखत शेअर केली. यामध्ये करण एका विद्यार्थ्याच्या प्रश्नावर उत्तर देत म्हणाला, 'नंबर्स बदलता येतात आणि पैसे देऊन काहीही बदलता येऊ शकतं.' करणचा हाच व्हिडिओ शेअर करत कंगनाने लिहिले, 'करण जोहर म्हणतोय की मी पैसे फेकून काहीही करु शकतो. कोणताही समज बनवू शकतो. हा फक्त स्वत:चा सिनेमा हिट करतो स्वत:चं महिमामंडन करतो की दुसऱ्यांचं नकारात्मक पीआर आणि युनिट फिल्म फ्लॉप सुद्धा करतात?'
आणखी एका पोस्टमध्ये कंगना म्हणते, 'घृणित काम करणं क्राईम नाही, पण समज बदलण्यासाठी चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगलं करणं हा राक्षसी, दुष्ट आणि दुर्भावनापूर्ण स्वभाव आहे. हिंदी फिल्म इंडस्ट्री बुडत्या जहाजाप्रमाणे आहे आम्हाला याची आवश्यकता आहे. स्वत:मध्ये झोकून बघा की आपल्याच जहाजात छेद का आहे. आशा आहे की हे समजलं असेल, चांगलं काम करण्यासाठी कधीच उशीर होत नाही.'
कंगना आणि करण जोहरचा वाद सतत सुरुच असतो. कोणत्या ना कोणत्या विषयावर कंगना करण जोहरला निशाण्यावर घेत असते. तर करण मात्र अनेकदा शांत राहणंच पसंत करतो. सध्या करण 'रॉकी और रानी प्रेम कहानी' चं यश एन्जॉय करत आहे. तर कंगनाचा आगामी 'इमर्जन्सी' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.