Lok Sabha Election Result 2024: बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana Ranaut) यंदा हिमाचल प्रदेशच्या मंडी क्षेत्रातून भाजपाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली. यात तिला यश येताना दिसतंय. आज देशात मतमोजणी सुरु आहे आणि मंडी येथे कंगना आघाडीवर आहे. विरोधात असणारे काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांना ती मात देतानाचं सध्या तरी चित्र दिसतंय. कंगनाने घरी देवाची पूजा केली, आईचे आशीर्वाद घेतले. तर नुकतीच तिने ANI ला प्रतिक्रिया दिली.
कंगना राणौत मंडीतून सध्या तब्बल 37 हजार मतांनी आघाडीवर आहे. तिचा विजय जवळपास निश्चित आहे. कंगनाने घरी आईचा आशीर्वाद घेतला. यानंतर ANI शी संवाद साधताना ती म्हणाली, "एखाद्या महिलेबाबत अशा प्रकारे चुकीचं विधान केल्यानंतर आता त्यांना हे भोगावं लागेल. आज ज्या प्रकारे मंडी क्षेत्रातून भाजपाला आघाडी मिळाली आहे यातून सगळं स्पष्ट होतच आहे. मंडीच्या जनतेने महिलांच्या अपमानाचा बदला चांगल्या पद्धतीने घेतला नव्हता. माझ्या मुंबईला जाण्याबाबतीत सांगायचं तर ही माझी जन्मभूमी आहे. मी इथे लोकांच्या सेवेसाठी तत्पर असेल. मोदीजींचं जे स्वप्न आहे 'सबका साथ सबका विकास' यात मी नेहमीच त्यांची सेना बनून काम करेन. त्यामुळे मी कुठेही जाणार नाही. इतरांना कदाचित आपलं सामान बांधून जावं लागेल पण मी कुठेही जाणार नाही."
कंगना राणौतला तिच्या जन्मभूमीतूनच उमेदवारी मिळाली. गेल्या काही महिन्यांपासून कंगना मंडी येथे जोरदार प्रचार करत होती. जनतेनेही तिच्यावर विश्वास दाखवल्याचं चित्र दिसतंय. तिला अनेक हजार मतांनी आघाडी मिळाली आहे. त्यामुळे कंगनाचा विजय आता जवळपास निश्चित आहे. तसंच बॉलिवूडमध्ये परत जाण्याबद्दलही तिने स्पष्टता केली आहे. आता जनतेचा विकास हे एकच ध्येय तिने समोर ठेवलं आहे. त्यामुळे कंगना सिनेमात दिसणार नाही का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.