काही वर्षांपूर्वी आमिर खानचा सत्यमेव जयते हा कार्यक्रम चांगलाच गाजला होता. या कार्यक्रमात अनेक सामाजिक समस्यांवर चर्चा केली जात असे. तसेच या समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न देखील केला जात असे. या कार्यक्रमाच्या एका भागात महिलांवर होत असलेले अत्याचार, छेडछाड यावर चर्चा केली गेली होती. एवढेच नव्हे तर चित्रपटात दाखवलेल्या नायकाच्या प्रतिमेचा लोकांच्या मनावर किती परिणाम होतो याबाबत देखील या कार्यक्रमात चर्चा झाली होती.
त्यावेळी आपण चित्रपटांमध्ये अनेक गोष्टी खूप चुकीच्या दाखवतो असे स्वतः आमिर खानने कबूल केले होते. एवढेच नव्हे तर मी माझ्या चित्रपटांच्या माध्यमातून अशा चुकीच्या गोष्टी केल्या आहेत असे देखील त्याने सांगितले होते. या खास भागासाठी बॉलिवूडच्या तीन अभिनेत्री उपस्थित होत्या. कंगना रणौत, दीपिका पादुकोण आणि परिणिती चोप्रा यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही गोष्टींविषयी या कार्यक्रमात सांगितले होते.
कंगना रणौतचे बालपण एका छोट्या गावात गेले आहे. तिने तिच्या शालेय जीवनातील एक गोष्ट सत्यमेव जयते या कार्यक्रमात सांगितली होती. ही गोष्ट ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. कंगनाने सांगितले होते की, मी चंडीगडच्या एका शाळेत जायचे. तेव्हा आम्ही चालत असताना बाईककरून जाणारी मुले आम्हाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचे. एकदा एक मुलगा बाईकवरून आला, मी त्यावेळी चालत जात होती. मला तो स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असताना त्याने माझ्या छातीवर जोरात हात मारला. त्यामुळे मी तिथल्या तिथे कोसळली. मी काही मिनिटे तरी तशीच पडून होते. मी स्वतःला कशीबशी सावरत उभी राहिले. पण त्यानंतर माझ्या मनात एकच प्रश्न होता की, ही घटना कोणी पाहिली नाही ना...
कंगनाचे हे सगळे बोलणे ऐकल्यानंतर परिणिती चोप्रा म्हटली होती की, आपल्या समाजात अशा घडणाऱ्या गोष्टींसाठी त्या विकृत मुलाला नव्हे तर मुलीलाच जबाबदार धरले जाते आणि हे चुकीचे आहे.