देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्त्वाची बैठक बोलवली होती. या बैठकीला कोरोनाचा सर्वाधिक फटका असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत मोदींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली. अशा खाजगी संवादाचा प्रचार-प्रसार केला जात नाही. तुम्ही एक अतिशय महत्त्वाचा प्रोटोकॉल मोडला आहे, अशा शब्दांत मोदींनी केजरीवालांना सुनावलं. यानंतर केजरीवाल बांभावून गेले. त्यांनी हात जोडून पंतप्रधान मोदींची माफी मागितली होती. पण आता या प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना रणौतने केजरीवाल यांना सोशल मीडियाद्वारे सुनावले आहे.
या बैठकीचा व्हिडीओ बीजेपी महिला मोर्चाच्या प्रीती गांधी यांनी त्यांच्या ट्विटरवरुन शेअर केला असून त्यासोबत लिहिले आहे की, “बैठकीत झालेल्या खाजगी चर्चेचे थेट प्रसारण आणि महत्त्वाचा प्रोटोकॉल मोडल्यानंतर पंतप्रधानांनी फटकारल्यानंतरही अरविंद केजरीवाल हे ऐकायला तयार नाही. काय झालं ते पाहा.” प्रीती गांधी यांचा हा व्हिडिओ शेअर करत कंगनाने लिहिले आहे की, तुमच्या अनेक चुका आहेत... 1. स्वतःच्या प्रमोशनमध्ये राज्याचा पैसा वाया घालवणे. 2. वेगवेगळे प्रमोशन आणि दंगलीत राज्याच्या पैशांचा अपव्यय 3. नि: शुल्क वीज आणि पाणी देत मतदारांना थोड्या वेळासाठी संतुष्ट करणे, दीर्घ काळासाठी काही योजना/पायाभूत सुविधा नाही, देशाच्या राजधानीत एकही ऑक्सिजन प्लांट नाही...
कंगनाच्या या ट्वीटनंतर कंगनाचे म्हणणे योग्य आहे असे काहींनी म्हटले आहे तर काहींनी ही फक्त द्वेष परवते... तसेच केजरीवाल हे सगळ्यात चांगले मुख्यमंत्री आहेत असे तिला सुनावले आहे.