कंगना रणौत आजवर अनेकवेळा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. आता तिने सोशल मीडियावर केलेल्या एका ट्वीटमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.
गेल्या आठवडाभरात देशात ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. देशातील सगळ्याच राज्यात अतिशय वाईट परिस्थिती आहे. कोरोना रुग्णांची वाढ दिवसेंदिवस प्रचंड होत आहे. ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्याने आरोग्य सुविधेवर ताण वाढतोय.
नुकतेच भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देशात पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. या ट्वीटद्वारे मेदान्ता या रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. नरेश त्रेहन यांनी रुग्णालयाकडे पुरेसा ऑक्सिजन साठा असून अफवांवर विश्वास ठेवू नका असं सांगितलं होतं. शिवाय गरज असेल तरच ऑक्सिजनचा वापर करा असे लिहिले आहे. हे ट्वीट कंगनाने सोशल मीडियावर शेअर केले असून त्यासोबत तिने लिहिले आहे की, संसाधन देशाला तोडण्यासाठी देशद्रोही शक्ती त्यांचा वेळ वाया घालवत आहेत, त्या आज तुमचं मनोबल तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यापासून सावध रहा...
कंगनाने केलेल्या या ट्वीटनंतर तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. कंगनाने हे ट्वीट शेअर केल्यानंतर तू बीजेपीची अनधिकृत प्रवक्ता आहे असे सुनावले आहे. तू राजकारणातच जा... असे देखील काहींनी तिला सांगितले आहे. ऑक्सिजन नसल्याने लोक मरत आहेत आणि तुम्ही असे ट्वीट करत आहाता असे देखील एकाने ट्वीट केले आहे.