सातत्याने ट्विट करत चर्चेत राहणारी कंगना राणौत गेल्या काही दिवसांपासून ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर संतापली आहे. अगदी ट्विटरविरोधात तिने मोहिमच छेडली आहे. आता कंगनाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर कठोर कारवाई करत, त्यावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाली कंगना?
आदरणीय पंतप्रधान, जी चूक महान योद्धा पृथ्वीराज चौहान यांनी केली होती ती तुम्ही अजिबात करू नका. त्या चुकीचे नाव होते माफी. ट्विटर कितीही वेळा क्षमा मागेल पण क्षमा करू नका. त्यांनी भारतात गृहयुद्धाचा कट रचला होता, असे ट्विट कंगनाने केले आहे. कंगनाने याआधीच ट्विटर बॅन करण्याची मागणी केली होती. या ट्विटमध्ये त्यांनी #BanTwitterInIndia असा हॅशटॅगही लिहिला आहे.अलीकडे कंगनाने शेतकरी आंदोलनाला विरोध करत अनेक ट्विट्स केले होते. यापैकी काही वादग्रस्त ट्विट्सवरून वाद पेटला होता. आपल्या ट्विट्समध्ये कंगनाने आंदोलनकर्त्या शेतक-यांना खलिस्तानी, दहशतवादी असल्याचे म्हटले होते. या वादग्रस्त ट्विट्सपैकी काही ट्विट्स ट्विटरने डिलीट केले होते. त्याआधी तिच्या ट्विटर अकाऊंटवर काही मर्यादा लादल्या होत्या. यामुळे कंगना खवळली आहे.
बुधवारी ट्विटरने भारतातील काही अकाऊंट्स ब्लॉक करण्यावर स्पष्टीकरण दिले होते. भारतातील काही अकाऊंटला स्थानिक धोरणानुसार ब्लॉकिंग ऑर्डरमध्ये टाकण्यात आले असल्याचे ट्विटरने स्पष्ट केले होते. यावरूनही कंगना ट्विटरवर बरसली होती. ‘तुम्हाला कोणी चीफ जस्टिस बनवले? अनेकदा तुम्ही पण गटबाजी करता आणि मग त्रासदायक हेडमास्तर बनता. अनेकदा तर स्वत:ला पंतप्रधान समजता. काही नशेबाजांचे गट तुम्हाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत,’असे कंगनाने लिहिले होते. यात कंगनाने जॅकला टॅग केले होते.कालपरवाच कंगनाने ट्विटर आता तुझी वेळ संपली आहे, अशा आशयाचे ट्विट करून K00 अॅपवर शिफ्ट होणार असल्याचे सांगितले होते.