Join us

'मंडे ब्लूज'चं रडगाणं थांबवा', कंगना रणौतचं वर्क कल्चरबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाली - 'ही सगळी पाश्चात्य विचारसरणी'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 9:09 AM

कंगनाने सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला.

विकेंड संपत आला की आपल्याला सोमवारचा दिवस उगवूच नये असं अनेकदा वाटतं. सोमवार आला की अनेकांचे चेहरेच पडतात आणि शुक्रवार आला की हेच चेहरे खुलतात. नोकरी करणारे लोक कधी विकेंड सुरु होतो याचीच वाट बघत असतात. सोशल मीडियावरही याचे काही मीम्स, जोक्स आणि ट्विट व्हायरल होतात. यातच आता खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत हिनं विकेंडबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. कंगाना हिनं तरुणांना विकेंडची वाट पाहणं थांबवण्याचा  आणि आळस-कंटाळा सोडून काम करण्याचा सल्ला दिलाय.

कंगनाने सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान हे तरुणांना विकसित भारतावर संबोधित करत असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये कंगनाने लिहलं, 'आपल्याकडे Obsessive work culture अर्थात अतिपरिश्रम करण्याची संस्कृती बिंबवणं गरजेचं आहे.  आपण आठवड्याच्या सुट्टीची वाट पाहणं आणि 'मंडे ब्लूज'चे मिम्स पाहून दुःख व्यक्त करणं थांबवलं पाहिजे. हे सगळं पाश्चिमात्य संस्कृतीचं उद्दात्तीकरण आहे आणि अजून आपण विकसित देश झालो नसल्यामुळे आपण आळस आणि कंटाळा सोडला पाहिजे, ते आपल्याला परवडणारं नाही'.

कंगनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावर काही नेटकऱ्यांनी कंगनाशी सहमत असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी मात्र तिला ट्रोल केलं आहे. नोकरी करणाऱ्यांना कंगनाचे हे मत बिलकूल पटलेलं नाही. कंगनाच्या आधी अनेक नेत्यांनी भारतीय कार्यसंस्कृतीवर अशी विधाने केली आहेत. इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनीही असेच वक्तव्य केलं होतं, त्यानंतर सोशल मीडियावर त्यांनाही ट्रोल करण्यात आलं होतं. देशाची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लोकांनी आठवड्यातून 70 तास काम केले पाहिजे, असे ते म्हणाले होते.

टॅग्स :कंगना राणौतसेलिब्रिटीबॉलिवूडमंडीनरेंद्र मोदी