अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पार पडल्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी आनंद साजरा करण्यात आला. बॉलिवूडही याला अपवाद नव्हते. अनेक बॉलिवूड कलाकारांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत यात आघाडीवर होती. तिच्या आनंदाला पारावार नव्हता. लागोपाठ काही टिष्ट्वट करत तिने राम मंदिर निर्माणाचा आनंद व्यक्त केला. आता कंगनाने राम मंदिरावर चित्रपट बनवण्याचा संकल्प सोडला आहे. कंगना हा सिनेमा स्वत: दिग्दर्शित करणार आहे.
राम मंदिरावर बनवण्यात येणा-या या सिनेमाचे नावही तिने जाहिर केले आहे. ‘अपराजिता अयोध्या’ असे या सिनेमाचे नाव असणार आहे. या सिनेमात 600 वर्षांमधील प्रवास उलगडण्याचा प्रयत्न ती करणार आहे. के. व्ही. विजयेंन्द्र प्रसाद ‘अपराजिता अयोध्या’ची पटकथा लिहिणार आहेत. त्यांनीच कंगनाच्या ‘मणिकणिृका- द क्वीन आॅफ झांसी’ची पटकथा लिहिली होती. कंगनाच्या ‘मणिकर्णिका’ या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती होणार आहे.
कंगना म्हणते, भक्ती व विश्वासाची कहाणीआपल्या या आगामी सिनेमाबद्दल कंगना म्हणाली, ‘ राम मंदिरासाठी 600 वर्षांपर्यंत संघर्ष करावा लागला. बाबराने अनेक हिंदू देवळ उद्धवस्त केलीत. रामजन्मभूमीही यातून सुटली नाही. यानंतर 72 युद्ध लढली गेलीत. इंग्रजांनीही हिंदू व मुस्लिमांमध्ये फुट पाडण्यासाठी मंदिराचा वापर केला. माझ्या या सिनेमात इथून ते भूमिपूजनापर्यंतचा ऐतिहासिक क्षण असे सगळे दाखवले जाईल. आम्ही लवकरच या सिनेमाचे शूटींग सुरु करू. मी या सिनेमासाठी प्रचंड उत्सुक आहे. ’