Join us

कंगना रणौतचा 'धाकड' आणि 'तेजस' फ्लॉप; निर्मात्यांना सोसावं लागलं 129 कोटी रुपयांचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 1:15 PM

गेल्या काही वर्षात कंगनाच्या फ्लॉप सिनेमांची यादी वाढतच चालली आहे.  

बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कंगना राणौत. पण गेल्या काही वर्षात कंगनाच्या फ्लॉप सिनेमांची यादी वाढतच चालली आहे.  मणिकर्णिका हा त्यांचा शेवटचा हिट चित्रपट होता. जो 2019 मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर तिने 'जजमेंटल है क्या', 'पंगा', 'थलाईवी' आणि 'धाकड' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण, हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकले नाहीत. नुकताच प्रदर्शित झालेला 'तेजस' सिनेमा फ्लॉप ठरला. आकड्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर कंगनाचे मागील दोन चित्रपट 'धाकड' आणि 'तेजस' मधून निर्मात्यांना 129 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

'तेजस'चे दिग्दर्शन नवोदित सर्वेश मेवाडा यांनी केले होते. हा चित्रपट 70 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. मात्र 'तेजस'ने देशातून केवळ 4.25 कोटींची कमाई केली. तर, 4.25 कोटींपैकी 1.91 कोटी रुपये वितरकांकडे गेले. निर्मात्याला 2.34  कोटी रुपये मिळाले. 'तेजस'च्या सॅटेलाइट, म्युझिक आणि स्ट्रीमिंग अधिकारांची किंमत अंदाजे 17 कोटी रुपये आहे. एकूण संकलन 19.34 कोटी रुपयांवर पोहोचले. चित्रपटाच्या 70 कोटींच्या बजेटमधून 19.34 कोटी रुपये वजा केले तर 50.66 कोटी रुपये शिल्लक राहतील. म्हणजेच कंगनाच्या 'तेजस' मधून निर्मात्यांना 50.66 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

कंगनाच्या 'धाकड' या चित्रपटामुळेही कोटी रुपयांचं नुकसान निर्मात्यांना सोसावं लागलं आहे. 'धाकड' 80 ते 85 कोटी रुपयांमध्ये बनला होता. या चित्रपटाने जगभरातून केवळ 3.17 कोटींची कमाई केली. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, 'धाकड'च्या निर्मात्यांना या चित्रपटामुळे 78.72 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 'तेजस' आणि 'धाकड' मुळे झालेले नुकसान जोडले तर एकूण रक्कम 129.38 कोटी रुपये होते.

पद्मश्री पुरस्कार आणि चार राष्ट्रीय पुरस्कार कंगनाच्या नावावर आहेत. पण कंगनाच्या सिनेमाला प्रेक्षकांची खचाखच गर्दी होत नाही.  येत्या काही दिवसांत कंगना 'इमर्जन्सी' नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये ती देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. कंगनाने स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सध्या तिला आता एका हिटची गरज आहे. कंगनाच्या अभिनयाची जादू कमी तर होत नाही असा असा प्रश्न पडलेल्या तिच्या चाहत्यांकडून  'इमर्जन्सी'ला कसा प्रतिसाद मिळणार यावर कंगनाचं करिअर अवलंबून आहे असं सध्या तरी दिसतंय.

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूडसिनेमा