Join us

कनिका कपूरच्या अडचणीच वाढ, वाचा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर आता काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 1:59 PM

कनिकाला रुग्णालयातून नुकताच डिस्चार्ज मिळाला आहे.

ठळक मुद्देसुजीत पांडे यांनी सांगितले आहे की, कनिकाविरोधात लखनऊमधील सरोजिनी नगर, हजरतगंज येथे एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे कनिकाची लवकरच चौकशी केली जाणार आहे. 

बॉलिवूड सिंगर कनिका कपूर कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने सर्वत्र खळबळ माजली होती. पण आता 18 दिवसांच्या उपचारानंतर कनिका एकदम ठीक झाली असून तिला रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 4 एप्रिलला कनिकाची पाचवी चाचणी करण्यात आली. यात तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. यानंतर तिचा सहावा रिपोर्टही निगेटीव्ह आला. यानंतर रुग्णालयातून तिला सुट्टी देण्यात आली. कनिका कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने तिचे कुटुंब आनंदात आहे. पण रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता कनिकाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

कनिकाने परदेशातून परतल्यानंतर आयसोलेशनमध्ये न राहाता काही पार्टींना हजेरी लावली होती. त्यामुळे कनिका विरोधात लखनऊमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. कनिकाविरोधात कलम 188, 269 आणि 270 च्या अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता लखनऊचे पोलिस कमिश्नर सुजीत पांडे यांनी कनिकाची याबाबत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. कनिका सध्या १४ दिवस आयसोलेशनमध्ये असून त्यानंतर तिची चौकशी केली जाणार आहे.

न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, सुजीत पांडे यांनी सांगितले आहे की, कनिकाविरोधात लखनऊमधील सरोजिनी नगर, हजरतगंज येथे एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे कनिकाची लवकरच चौकशी केली जाणार आहे. 

कनिका कपूर काही दिवसांपूर्वीच लंडनवरून भारतात परतली होती. लंडनवरून भारतात परतल्यावर कनिकाने एक हायप्रोफाइल पार्टी सुद्धा अटेंड केली होती. ज्यात राजकीय वतुर्ळातील अनेक नेते आणि जज यांच्यासह जवळपास 400 लोक सामील झाले होते. या यानंतर कनिका कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट होताच सगळ्यांचे धाबे दणाणले होते. निष्काळजीपणा बाळगून अनेकांचा जीव धोक्यात आणल्याबद्दल तिच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. 

कनिकाने इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी एक पोस्ट लिहिली होती आणि त्यात म्हटले होते की, गेल्या चार दिवसांपासून मला ताप येत असल्याने मी कोरोनाची टेस्ट केली असून ती पॉझिटिव्ह आली आहे. मी आणि माझे कुटुंब सध्या सगळ्यांपासून पूर्णपणे वेगळे राहात असून डॉक्टरांनी दिलेला सल्ला ऐकत आहोत. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांची देखील तपासणी केली जाईल. दहा दिवसांपूर्वी परदेशातून परतल्यावर विमानतळावर माझे स्कॅनिंग करण्यात आले होते. पण त्यावेळी कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. मी घरी येऊन दहा दिवस झाले असून गेल्या चार दिवसांपासून माझ्या शरीरात कोरोनाची लक्षणं जाणवत आहेत. मी सगळ्यांना विनंती करते की, तुमच्या शरीरात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळल्यास तुमची टेस्ट करून घ्या आणि सगळ्यांपासून काही दिवस वेगळे राहा.. सुजाण नागरिकाप्रमाणे स्वतःची आणि इतरांची देखील काळजी घ्या... माझी तब्येत आता बरी असून केवळ मला थोडासा ताप आणि सर्दी आहे.

कनिकाने तिची ही इन्स्टाग्राम पोस्ट काही दिवसांपूर्वी डीलिट केली असून डीलिट करण्यामागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. 

टॅग्स :कनिका कपूरकोरोना वायरस बातम्या