कनिका कपूरला गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचीन लागण झाली असून ती लखनऊमधील संजय गांधी पीजीआई रुग्णालयात दाखल आहे. कनिका कपूरने परदेशातून आल्यानंतर स्वतःला क्वॉरंटाईन केले नाही. एवढेच नव्हे तर तिने अनेक सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावली. त्यामुळे तिच्यावर एफआरआय देखील दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर देखील कनिका स्टाफसोबत अतिशय वाईट पद्धतीने वागते अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून मीडियात येत आहेत. आता या सगळ्या प्रकरणावर कनिकाने आपली बाजू मांडली आहे.
अमरउजालाने दिलेल्या वृत्तानुसार, कनिकाने नुकतीच एक मुलाखत दिली असून या मुलाखतीत तिला कोरोनाची लागण झाल्यापासून तिची अवस्था काय झाली याविषयी सांगितले आहे. कनिकाने या मुलाखतीत सांगितले आहे की, १९ मार्चला संध्याकाळी ३.३० च्या सुमारास डॉक्टरांची टीम माझी टेस्ट करण्यासाठी आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता त्यांचा मला फोन आला की, मला कोरोनाची लागण झाली आहे. लगेचच माझ्या घरी एक अॅम्ब्युलन्स पाठवण्यात आली आणि मला लखनऊमधील पीजीआई रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. माझे आईवडील देखील अॅम्ब्युलन्सच्या मागे आमच्या गाडीने लगेचच माझ्या मागे आले. मला रुग्णालयात दाखल करताच मला रुग्णांचा ड्रेस घालायला सांगण्यात आला. पण वेगळी रूम न देता पडद्याच्या मागे जाऊन कपडे बदलायला सांगण्यात आले.
या सगळ्या गोष्टीवर कनिकाने नाराजी दर्शवली. त्यानंतर रूम अस्वच्छ असल्याबद्दल देखील हॉस्पिटलच्या स्टाफकडे तिने तक्रार केली आणि त्यांना साफसफाई करायला सांगितली. यावरूनच कनिका रुग्णालयात खूप नखरे करतेय असा तिच्यावर आरोप लावण्यात आला. पण आता कनिका डॉक्टरांना पूर्णपर्ण सहकार्य करत आहे.
कनिकाने इन्स्टाग्रामवर काही दिवसापूर्वी एक पोस्ट लिहिली होती आणि त्यात म्हटले होते की, गेल्या चार दिवसांपासून मला ताप येत असल्याने मी कोरोनाची टेस्ट केली असून ती पॉझिटिव्ह आली आहे. मी आणि माझे कुटुंब सध्या सगळ्यांपासून पूर्णपणे वेगळे राहात असून डॉक्टरांनी दिलेला सल्ला ऐकत आहोत. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांची देखील तपासणी केली जाईल. दहा दिवसांपूर्वी परदेशातून परतल्यावर विमानतळावर माझे स्कॅनिंग करण्यात आले होते. पण त्यावेळी कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. मी घरी येऊन दहा दिवस झाले असून गेल्या चार दिवसांपासून माझ्या शरीरात कोरोनाची लक्षणं जाणवत आहेत. मी सगळ्यांना विनंती करते की, तुमच्या शरीरात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळल्यास तुमची टेस्ट करून घ्या आणि सगळ्यांपासून काही दिवस वेगळे राहा.. सुजाण नागरिकाप्रमाणे स्वतःची आणि इतरांची देखील काळजी घ्या... माझी तब्येत आता बरी असून केवळ मला थोडासा ताप आणि सर्दी आहे.
कनिकाने ही पोस्ट आता सोशल मीडियावरून डीलिट केली आहे. कनिकावर कोरोनाची आतापर्यंत पाच वेळा टेस्ट करण्यात आली असून प्रत्येकवेळी ही पॉझिटिव्ह आली आहे.