देशभरात कोरोना व्हायरसची दहशत वाढत असताना आता एक धक्कादायक बातमी आहे. एका अभिनेत्याचे 36 व्या वर्षी निधन झाले आहे. तामिळ अभिनेता सेथुरामन याचे गुरुवारी रात्री चेन्नई हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्याच्या निधनामुळे तेलगू फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. गुरूवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास त्याच्या छातीत दुखू लागले आणि अचानक त्याचे निधन झाले.
सेथुरामन हा पेशाने डॉक्टर होता़ अॅक्टिंगसोबत तो क्लिनिकही चालवायचा. 2013 साली प्रदर्शित झालेल्या ‘कन्ना लड्डू थिना आना’ या रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपटामुळे सेथुरामन प्रचंड लोकप्रिय झाला होता. मात्र काही काळापासून अॅक्टिंग सोडून तो पूर्णवेळ क्लिनिक चालवत होता. चेन्नईत त्याचे स्किन केअर व कॉस्मेटोलॉजी क्लिनिक होते. अभिनेता सेथुरामन विवाहित होता. त्याला मुलं सुद्धा आहेत.
साउथ अभिनेता सतीश आणि अभिनेत्री ऐश्वर्या राजेश यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून सेथुरामनच्या निधनाची माहिती दिली. सतीशने ट्वीट करून सेथुरामनच्या निधनाची बातमी शेअर केली आहे. ‘सेथुरामनच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले. काही तासांपूर्वीच कार्डियक अरेस्टमुळे सेथुरामन याचे निधन झाले,’असे सतीशने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. ‘कन्ना लड्डू थिना आना’ हा सेथुरामन याचा पहिला सिनेमा होता. पण हा पहिलाच सिनेमा इतका लोकप्रिय झाला की, तो एका रात्रीत स्टार झाला. यानंतर 2016 मध्ये आलेल्या ‘वेलिबा राजा’, 2017 मध्ये प्रदर्शित ‘सक्का पोडू पोडू राजा’ या सिनेमात तो झळकला. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला ‘50-50’ हा त्याचा अखेरचा सिनेमा ठरला.