कन्नड कलाविश्वातील (kannada)ज्येष्ठ अभिनेते, सुपरस्टार सत्यजित (kannada actor satyajith) यांचं निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. सत्यजित गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी होते. अखेर बंगळुरुमधील बोरिंग हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
१९८३ साली 'अल्ला नीने ईश्वर नीने' या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या सत्यजित यांचं खरं नाव 'सय्यद निजामुद्दीन' असं होतं. परंतु, कलाविश्वात आल्यानंतर त्यांनी त्यांचं नाव सत्यजित असं बदललं. अष्टपैलू अशी ओळख असलेल्या सत्यजित यांनी ३० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये ६० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
सत्यजित यांच्या पश्चात्य त्यांची पत्नी सोफिया बेगम, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. सत्यजित यांची लेक पायलट असून मुलगा आकाश हा कन्नड कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे.
सत्यजित यांचे गाजलेले चित्रपट
'शिव मच्छिदा कन्नप्पा', 'म्हैसूर जन', 'किलर डायरी', 'किंग', 'ग्राम देवाथे', 'धुम्म', 'आप्तमित्र', 'सई', 'नम्मा बसवा', 'अरासू', 'अर्जुन', 'पेपर दोनी', 'क्रांतिवीरा सांगोली रायन्ना', 'अध्याय', 'रन्ना कट्टे', 'विराट' आणि 'रणथंथ्रा' या चित्रपटांचा समावेश आहे.