गेल्या वर्षी ‘कांतारा’ (Kantara ) हा सिनेमा आला आणि या सिनेमानं जादू केली. सिनेमा तसा कन्नड. पण रिलीज होताच या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धमाका केला. हा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून काही दिवसांनी ‘कांतारा’ हिंदीसह मल्याळ व तेलगू भाषेत डब करून रिलीज करण्यात आला. दिग्दर्शक व अभिनेता ऋषभ शेट्टीच्या या सिनेमानं केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांवर गारुड केलं. अगदी 16 कोटी रूपयांत तयार झालेल्या या सिनेमानं 400 कोटींची कमाई केली. आता या सिनेमाचा दुसरा भाग येतोय. होय, ‘कांतारा २’ची (Kantara 2) घोषणा झालीये.
होम्बले फिल्स या कांताराच्या प्रोडक्शन हाऊसनं नुकतीच ‘कांतारा २’ची घोषणा केली. ‘कांतारा २’मध्येही अभिनेता ऋषभ शेट्टी प्रमुख भूमिका साकारणार आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा देखील ऋषभचं पेलणार आहे. ‘कांतारा २’ येणार म्हटल्यावर साहजिकच सिनेप्रेमी क्रेझी झाले आहेत. अर्थात एक ट्विस्ट आहे. ‘कांतारा २’हा कांताराचा सिक्वेल नाही प्रिक्वेल आणणार आहे. म्हणजेच सिनेमात पुढची कहाणी दाखवण्यात येणार नाहीये. तर सिनेमात दाखवण्यात आलेल्या लोककथेचा आणखी विस्तार दाखवण्यात येणार आहे.
कधी येणार ‘कांतारा २’? ऋषभ शेट्टी सध्या ‘कांतारा २’च्या स्क्रिप्टिंगवर काम करतोय. पुढच्या काही महिन्यात सिनेमाच्या शुटींगला सुरूवात होणार आहे. ऋषभ शेट्टी सध्या सिनेमावर रिसर्च करतोय. पुढची कथा लिहिण्यासाठी तो कर्नाटकच्या किनारी जंगलात गेला होता. संपूर्ण टीम कांताराच्या प्रीक्वलच्या तयारीत आहेत. सिनेमाचा काही भाग हा पावसाळ्यात शूट करायचा आहे त्यामुळे टीम पावसाळ्याची वाट पाहत आहेत. सिनेमा पुढील वर्षी एप्रिल मे महिन्यात प्रदर्शित होऊ शकतो. पॅन इंडिया देखील सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी तयार आहे.
किती असेल बजेट?‘कांतारा २’चा बजेट हे ‘कांतारा’ पेक्षा अधिक असेल.येत्या पाच वर्षात येणाऱ्या सिनेमा आणि वेब सीरिजवर ३० अब्ज रुपये लावणार असल्याची घोषणा होम्बले स्टुडिओनं काही दिवसांआधीच केली होती. त्यामुळे ‘कांतारा २’ हा आतार्यंतचा सर्वात बिग बजेट सिनेमा असू शकतो. ‘कांतारा २’मध्ये काही नवे कलाकार दिसतील
‘कांतारा’ हा सिनेमा गेल्या ३० सप्टेंबरला रिलीज झाला होता. सर्वप्रथम फक्त कन्नड भाषेत हा सिनेमा रिलीज झाला होता. पहिल्याच दिवशी या सिनेमाने १.९८ कोटींचा गल्ला जमवला होता. कन्नड व्हर्जनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय म्हटल्यावर १४ दिवसांनंतर हा सिनेमा हिंदी, तामिळ व तेलगूत डब करून रिलीज केला गेला होता. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने ८२ कोटींची कमाई केली तर तेलगू व्हर्जनने ४२ कोटी कमावले. जगभर या चित्रपटाने ४०० कोटींपार बिझनेस केला.‘कांतारा’ हा सिनेमा दक्षिण भारतातील परंपरा, ग्रामदैवत आणि तिथल्या आदिवासी लोकांची श्रद्धा यावर आधारित आहे. रिषभ शेट्टीने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे आणि तोच या चित्रपटाचा हिरो आहे.