Join us

Kantara: 'कांतारा' चित्रपटावर गाणं चोरी केल्याचा आरोप, कोर्टानं दिला महत्वाचा आदेश! चित्रपटाला मोठा फटका बसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 7:44 PM

कन्नड चित्रपट 'कांतारा' सध्या संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे.

नवी दिल्ली-

कन्नड चित्रपट 'कांतारा' सध्या संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टीचा कांतारा चित्रपट फक्त कन्नडच नव्हे, तर तेलुगू, तमिळ, मल्ल्याळम आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे. 'कांतारा' चित्रपटाच्या हिंदीतील व्हर्जनची तुफान कमाई सुरू आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या 'रामसेतू' आणि अजय देवगणच्या 'थँक गॉड' या बिग बजेट सिनेमांनाही 'कांतारा' सिनेमा बॉक्स ऑफीसवर मागे टाकत आहे. पण हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 

‘कांतारा’ पाहिला आणि मुलाखत घेणाऱ्या युट्युबरने थेट ऋषभ शेट्टीचे पाय धरले...!!

केरळच्या Thaikudam Bridge या लोकप्रिय म्युझिक बँडनं 'कांतारा'च्या निर्मात्यांवर गाणं चोरीचा आरोप केला आहे. त्यासंबंधीची एक पोस्ट या बँडनं सोशल मीडियात प्रसिद्ध केली होती. इतकंच नाही, तर या बँडनं थेट कोर्टात देखील धाव घेतली. 'कांतारा' चित्रपटातील 'वराह रुपम' हे गाणं 'नवरसम' या ओरिजनल गाण्याशी हुबेहुब जुळणारं आहे, असा आरोप 'थायकुडम ब्रिज'नं केला आहे. 

"आम्ही आमच्या चाहत्यांना सांगू इच्छितो की Thaikudam Bridge बँडचा कोणत्याही पद्धतीनं कांतारा चित्रपटाशी संबंध नाही. ऑडिओच्या बाबतीत दोन्ही गाण्यांमधील समानता अजिबात दुर्लक्षित करता येणार नाही आणि त्यामुळे हे कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन आहे. आमच्या मते, 'प्रेरित' आणि 'चोरी' मधील एक रेष आहे की जी पाळली जाणं गरजेचं आहे. आता 'कांतारा' चित्रपटात वापरलेलं गेलेलं गाणं हे चोरीच्या वर्गवारीत येत हे निर्विवाद आहे आणि म्हणून आम्ही यासाठी जबाबदार असलेल्या क्रिएटिव्ह टीमवर कायदेशीर कारवाई करत आहोत. या सामग्रीवरील आमच्या हक्कांबद्दल कोणतीही माहिती नाही आणि हे गाणे चित्रपटाच्या क्रिएटिव्ह टीमचे मूळ काम म्हणून प्रमोट केले गेले आहे", असं   Thaikudam Bridge या बँडनं म्हटलं आहे. 

कोर्टानं काय म्हटलं?बँडनं आता याप्रकरणात कोर्टाचं म्हणणं देखील लोकांसमोर ठेवलं आहे. Thaikudam Bridge बँडच्या परवानगी शिवाय हे गाण चित्रपटात वापरण्यावर कोर्टानं कांतारा चित्रपटाच्या निर्मात्यांना मनाई केली आहे. "कोलिकोडच्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, म्युजिक कम्पोजर, यूट्यूब, स्पॉटीफाय, विंक म्युझिक, जियो सावन आणि इतर सर्वांना 'वराह रुपम' गाणं Thaikudam Bridge बँडच्या परवानगी विना वापरण्यास मनाई केली आहे", अशी माहिती बँडनं आपल्या नव्या पोस्टमधून दिली आहे. 

चित्रपटावर काय होणार परिणाम?'कांतारा' चित्रपट पाहिलेला कुणीही सहज सांगू शकेल की 'वराह रुपम' हे गाणं चित्रपटातील महत्वाचं गाणं आहे. चित्रपटातील काही महत्वाच्या प्रसंगांवेळी हे गाणं वापरण्यात आलं आहे. या गाण्यामुळेच काही सीन प्रेक्षणीय ठरले आहेत. गाण्यामुळे चित्रपटातील व्ह्युज्युअल्स, क्लायमॅक्सला वेगळं महत्व प्राप्त झालं आहे. अशा परिस्थितीत जर हे गाणं चित्रपटातून काढावं लागलं तर चित्रपटावर याचा नक्कीच परिमाण होईल. त्यामुळे आता कोर्टाच्या निर्णयावर चित्रपटाचे निर्माते कोणती भूमिका घेतात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. 'कांतारा' चित्रपटाच्या निर्मात्यांकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

टॅग्स :बॉलिवूड