Kantara Hindi OTT Release: ‘कांतारा’ (Kantara ) हा सिनेमा आला आणि या सिनेमानं जादू केली. सिनेमा तसा कन्नड. पण रिलीज होताच या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धमाका केला. हा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून काही दिवसांनी ‘कांतारा’ हिंदीसह मल्याळ व तेलगू भाषेत डब करून रिलीज करण्यात आला.
दिग्दर्शक व अभिनेता ऋषभ शेट्टीच्या या सिनेमानं केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांवर गारुड केलं. अगदी 16 कोटी रूपयांत तयार झालेल्या या सिनेमानं 400 कोटींची कमाई केली. नुकताच हा सिनेमा ‘प्राईम व्हिडीओ’ या ओटीटीवर रिलीज झाला. अर्थात फक्त तामिळ, तेलगू , कन्नड व मल्याळम या चार भाषेत. साहजिकच ओटीटीवर चित्रपटाचं हिंदी व्हर्जन रिलीज न झाल्यानं चाहत्यांची निराशा झाली होती. तेव्हापासून चाहते या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनची मागणी करत होते. तर आता ही प्रतीक्षाही संपलीये.
होय, तामिळ, तेलगू , कन्नड व मल्याळम पाठोपाठ चं हिंदी व्हर्जन ओटीटीवर रिलीज होत आहे. खुद्द रिषभ शेट्टीनं याचा खुलासा केला. येत्या 9 डिसेंबरला ‘कांतारा’चं हिंदी डब व्हर्जन ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. नेटफ्लिक्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य भाषेत प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे तर याचं हिंदी डब व्हर्जन नेटफ्लिक्सवर येणार आहे.
‘कांतारा’ हा सिनेमा गेल्या 30 सप्टेंबरला रिलीज झाला होता. सर्वप्रथम फक्त कन्नड भाषेत हा सिनेमा रिलीज झाला होता. पहिल्याच दिवशी या सिनेमाने 1.98 कोटींचा गल्ला जमवला होता. कन्नड व्हर्जनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय म्हटल्यावर 14 दिवसांनंतर हा सिनेमा हिंदी, तामिळ व तेलगूत डब करून रिलीज केला गेला होता. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने 82 कोटींची कमाई केली तर तेलगू व्हर्जनने 42 कोटी कमावले. जगभर या चित्रपटाने 400 कोटींपार बिझनेस केला.
‘कांतारा’ हा सिनेमा दक्षिण भारतातील परंपरा, ग्रामदैवत आणि तिथल्या आदिवासी लोकांची श्रद्धा यावर आधारित आहे. रिषभ शेट्टीने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे आणि तोच या चित्रपटाचा हिरो आहे.