नवी दिल्ली - द कपिल शर्मा शोचा प्रमुख होस्ट आणि सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका मराठी वाक्याचा अर्थ विचारला होता. आपल्या 'शो'मध्ये कपिल नेहमीच स्वत:ला इंग्रजी जास्त येत नसल्याचं दाखवून देतो. मात्र, हिंदी भाषेवर कपिलच प्रभुत्व आहे. मराठी भाषा काही प्रमाणात समजते, पण बोलता येत नाही. अनेकदा मराठी भाषा समजून घेतानाही अडखळतो. त्यामुळे, कपिलने चक्क ट्विटर अकाऊंटवरुनच मराठी भाषेतील एका वाक्याचा अर्थ विचारला आहे.
कपिलने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आपला फोटो शेअर करत एक मराठी वाक्य लिहिले आहे. 'शुटींग चालू आहे, काय तरी नवीन' अशा आशयाचे वाक्य कपिलने लिहिले आहे. तसेच, या वाक्याच्या पुढेच याचा हिंदी किंवा इंग्रजीत अर्थ सांगावा, अशी विनंतीही केलीय. कपिलच्या या ट्विटवर जवळपास 2 हजार युजर्संने कमेंट केल्या आहेत. तर, मराठीपुत्र आणि बॉलिवूडचा एक्टर रितेश देशमुखनेही कपिलच्या या ट्विटला रिट्वीट करत, मी सांगू का? असा प्रश्न मराठीतच केलाय.
कपिलच्या प्रश्नावर अनेकांनी कमेंट करुन उत्तर दिलंय. इसका मतबल, शुटींग चल रहा है, कुछ तो नया है.. असं उत्तर अनेकांनी दिलंय. पण, रितेशने मी सांगू का? असे म्हणत मराठीतच कपिलची फिरकी घेतली आहे.