Join us

कपिल शर्मा, राजपाल यादव, सुगंधा मिश्रा, रेमो डिसुझा यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला मेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 10:49 IST

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांना जीवे मारण्याची धमकी मिळालीय. थेट पाकिस्तानमधून धमकीचे हे मेल आले आहेत

बॉलिवूडमध्ये सैफ अली खानवर हल्ल्याचं प्रकरण ताजं असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी समोर येतेय. ती म्हणजे बॉलिवूडमधील चार कलाकारांना धमकीचे मेल आले आहेत. कपिल शर्मा, सुगंधा मिश्रा, कोरिओग्राफर रेमो डिसोझा आणि राजपाल यादव या चार कलाकारांना हे धमकीचे मेल आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या

बॉलिवूड कलाकरांना धमकीचा मेल

सुप्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव, कॉमेडियन कपिल शर्मा, सुगंधा मिश्रा, रेमो डिसूझा यांना हा धमकीचा मेल आला आहे. यासंबंधी पोलिसांनी FIR नोंदवून घेतला आहे. जर पुढील आठ तासात या कलाकारांनी या धमकीला काही उत्तर दिलं नाही तर पुढे आम्ही योग्य ती कारवाई करु, अशा शब्दात हा मेल आला आहे. रिपोर्ट्सनुसार धमकीचा हा मेल थेट पाकिस्तानातून आला आहे.

धमकीच्या मेलमध्ये काय लिहिलेलं?

मीडिया रिपोर्ट्सनुसार विष्णु नावाच्या एका व्यक्तीने हा ईमेल पाठवला आहे. यात लिहिलंय की, "आम्ही हा मेल पाठवून कोणताही पब्लिसिटी स्टंट करत नाही आहोत. तुमच्या दैनंदिन जीवनाबद्दल आमच्याकडे सर्व माहिती आहे. पुढील ८ तासांमध्ये तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्याल याची मी आशा करतो. जर तुम्ही काही उत्तर दिलं नाही तर तुम्ही आम्हाला गांभीर्याने घेतलं नाही असं आम्ही गृहित धरु." पोलीस IP Address चा शोध घेऊन धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

 

टॅग्स :कपिल शर्मा सुगंधा मिश्राराजपाल यादवरेमो डिसुझा