'द ग्रेट इंडियन कपिल शो' सध्या नेटफ्लिक्सवर जोरात सुरु आहे. कपिल शर्मा, कृष्णा अभिषेक, कीकू शारदा आणि सुनील ग्रोवरच्या कॉमेडीने पुन्हा एकदा सर्वांनाच खळखळून हसवलं आहे. अनेक सिनेमांची टीम, दिग्गज कलाकार या शोमध्ये येऊन गेले. शोचा दुसरा सीनझही आता संपणार आहे. यामध्ये वरुण धवनच्या 'बेबी जॉन' सिनेमाच्या टीमने हजेरी लावली आहे. यावेळी निर्माता अॅटलीच्या लूक्सवर कपिल शर्माने त्याची खिल्ली उडवली. यावर अॅटलीने दिलेल्या उत्तराचं खूप कौतुक होत आहे.
वरुण धवन अॅटलीच्या (Atlee) आगामी 'बेबी जॉन' सिनेमात दिसणार आहे. सिनेमाच्या टीमने कपिल शर्मा (Kapil Sharma) शोमध्ये एन्ट्री घेतली. यावेळी कपिलने अॅटलीला असा प्रश्न विचारला ज्यावरुन तो त्याच्या दिसण्याची खिल्ली उडवतोय हे स्पष्ट दिसत होतं. तो म्हणाला, 'सर तुम्ही खूप तरुण आहात. पण आज दिग्गज दिग्दर्शक, निर्मात्यांमध्ये तुमचंही नाव आहे. पण असं कधी झालंय का की तुम्ही एखाद्या स्टार कलाकाराला भेटलात आणि म्हणालात मी अॅटली. यावर त्या स्टारला पटतच नाही की तुम्ही अॅटली आहात आणि तो तुम्हाला विचारतो का की, 'अॅटली कुठे आहे?' कपिलच्या या प्रश्नावर अॅटलीला त्याचा रोख कळतो.
अॅटली उत्तर देत म्हणतो, "सर तुमचा इशारा कुठे आहे मला समजतंय. मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. मी एआर मुरुगदास सरांचा खूप आभारी आहे. कारण त्यांनी माझ्या पहिल्या सिनेमाची निर्मिती केली. त्यांनी मला स्क्रीप्ट मागितली ना की मी कसा दिसतोय हे पाहिलं. मी यासाठी खरंच पात्र आहे पण की नाही हे त्यांनी पाहिल. मी केलेलं नरेशन त्यांना आवडलं. मला वाटतं माणूस कसा दिसतो यावरुन त्याचं परीक्षण करु नये तर त्याचं मन कसं आहे हे पाहावं."
अॅटलीच्या या उत्तराचं सध्या सगळीकडे कौतुक होतंय. इतकंच नाही तर असा प्रश्न विचारल्यामुळे कपिल शर्मावर अनेकजण राग व्यक्त करत आहेत.