ठळक मुद्देकरण देओलने सांगितले की, “माझ्यात आणि माझे बडे पापा यांच्यात हे साम्य आहे की, मी देखील व्हिडिओ गेम कॅसेट आणण्यासाठी माझ्या आईच्या पर्समधून 100-200 रुपये घेत असे. कारण मला लहानपणी व्हिडिओ गेम्स खेळायला खूप आवडायचे.”
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपरस्टार सिंगर हा कार्यक्रम सुरू झाल्यापासूनच एक जबरदस्त लहान मुलांचा गायन रिॲलिटी शो ठरला आहे. प्रत्येक आठवड्याला या लहान मुलांची अप्रतिम सादरीकरणे प्रेक्षकांनी पाहिली आहेत आणि आता ही स्पर्धा शिगेस पोहोचते आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात धर्मेंद्र, सनी देओल, करण देओल आणि सहर बाम्बा हजेरी लावणार आहेत. हे या कार्यक्रमात ‘पल पल दिल के पास’चे प्रमोशन करणार आहेत.
‘ओ मेरी महबूबा’ वरील फाझिलच्या परफॉर्मन्सनंतर सूत्रसंचालक जय भानुशाली आणि धर्मेंद्र यांच्यात मनमोकळा संवाद झाला. आपले बालपण आणि लहानपणीचा आपला खोडकर स्वभाव याबद्दल बोलताना धर्मेंद्र यांनी सांगितले, “मला माझे गाव खूप आवडते आणि जेव्हा कधी मला माझ्या कामातून वेळ मिळतो तेव्हा मी गावी जातो. मला अजूनही आठवते की, लहानपणी माझ्या वडिलांना न सांगता त्यांच्या खिशातून 2-3 आणे घ्यायचो आणि मिठाईच्या दुकानात जाऊन मिठाई आणि स्नॅक्स खायचो. कधी कधी तर माझ्याकडे अजिबातच पैसे नसायचे. पण तरी देखील पैसे न देताच मी मिठाईवाल्याच्या दुकानात जाऊन मला आवडणाऱ्या पदार्थांवर यथेच्छ ताव मारत असे. पण यावरून मला चांगलाच ओरडा देखील खायला लागायचा. कारण माझे वडील त्या मिठाईवाल्याच्या दुकानात गेल्यानंतर दुकानदार त्यांना सांगायचा की, मी पैसे न देताच त्याच्या दुकानातून मिठाई खाल्ली आहे आणि मग त्याचे पैसे माझ्या वडिलांना द्यावे लागत असे.”
धर्मेंद्र यांनी बालपणाच्या सांगितलेल्या या आठवणीनंतर त्यांचा नातू करण देओलने सांगितले की, “माझ्यात आणि माझे बडे पापा यांच्यात हे साम्य आहे की, मी देखील व्हिडिओ गेम कॅसेट आणण्यासाठी माझ्या आईच्या पर्समधून 100-200 रुपये घेत असे. कारण मला लहानपणी व्हिडिओ गेम्स खेळायला खूप आवडायचे.”
सुपर सिंगर या कार्यक्रमात आता या भागापासून वोटिंग प्रक्रिया सुरू होणार आहे आणि आतापासून हे स्पर्धक त्यांना मत देण्यासाठी प्रेक्षकांना विनंती करणार आहेत.