बॉलिवूड अन् नेपोटिझमच नातं हे खुपच जूनं आहे. बॉलिवूडमध्ये चांगल्या कलाकारांना डावलून नेपो बेबीजला प्राधान्य दिले जाते, असा आरोप बऱ्याचदा करण जोहरवर केला जातो. नेपोटीझमवरून सोशल मीडियावर करणला जोरदार ट्रोल करण्यात येते. नेपोटीझमच्या आरोपावर आता करण जोहरने मौन सोडले आणि ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
नुकतेच करण जोहरने सौदी अरेबियात रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. यावेळी करणला नेपोटिझमवर प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला,' यापेक्षा मोठे खोटे हे दुसरे काहीच असू शकत नाही. उदाहरण म्हणून सांगतो, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटासाठी जेव्हा आलिया भट्टचे ऑडिशन पाहिले, तेव्हा ती या भुमिकेसाठी सर्वोत्कृष्ट आहे, हे मला कळालं. ती कोणाची मुलगी आहे आणि ती कोणत्या कुटुंबातून आली आहे याने काही फरक पडत नाही'.
पुढे तो म्हणाला, 'आत्तापर्यंत मी तीसहून अधिक लोकांना चित्रपटात संधी दिली आहे. कुणाला संधी मिळते तर कुणी वाट पाहतो, ही भाग्याची गोष्ट आहे. हॉलिवूडमध्येही नेपोटिझम राहिलं आहे. भारतात तर हे फार उशीरा आलं. माझे वडील यश जोहर म्हणायचे की लोकांना लोकांची गरज आहे. आपण यश किंवा अपयशाची चिंता करणे थांबवले पाहिजे आणि लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी तेच सिनेसृष्ट्रीत करत आहे'.