सुशांत सिंग राजपूतने डिप्रेशनमुळे आत्महत्या केली, असे मानले जात असतानाच तो बॉलिवूडमधील घराणेशाहीचा बळी ठरला, असेही म्हटले जात आहे. याचमुळे त्याच्या मृत्यूनंतर नेपोटिजमचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आहेत. करण जोहर आणि त्याची गँग सोशल मीडियावर अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल होतेय. या ट्रोलिंगमुळे करण जोहर प्रचंड दुखावला आहे. रात्रंदिवस तो नुसता रडत असतो, असा खुलासा आता त्याच्या एका जवळच्या मित्राने केला आहे.
करण जोहर सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतो. पण सुशांतच्या निधनानंतर त्याने त्याच्या सोशल अकाऊंटवर एकही पोस्ट शेअर केलेली नाही. मात्र तरीही तो प्रचंड ट्रोल होतोय. बॉलिवूड हंगामाने त्याच्या मित्राच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार,या चौफेर टिकेने करण आतून कोलमडलाय.
ट्रोलर्सच्या हल्ल्यांनी याआधी तो कधीही इतका प्रभावित झाला नव्हता. या ट्रोलिंगचा त्याच्या प्रकृतीवरही वाईट परिणाम झाला आहे. ट्रोलर्स त्याच्यावर नाही तर त्याच्या जवळच्या लोकांबद्दलही वाईट बोलत आहेत. त्याच्या जुळ्या मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत, हे पाहून करण अधिक दु:खी आहे.त्याच्या मित्राने सांगितले की, करण सध्या काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नाही. त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला तरी तो ढसाढसा रडायला लागतो. मी असे काय केले की, लोक मला इतक्या शिव्या घालत आहेत, असा एकच प्रश्न तो विचारतो.
कमी झालेत इतके फॉलोअर्स
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येने बॉलिवूडमधील वातावरण ढवळून निघाले आहे. सुशांतने डिप्रेशनमधून आत्महत्या केल्याचे मानले जात आहे. पण काहींच्या मते, सुशांत बॉलिवूडमधील नेपोटिझमचा बळी ठरला. या पार्श्वभूमीवर कंगना राणौतने थेटपणे करण जोहरवर आरोप केले होते. करण जोहरने कधीच सुशांतला आपल्या पार्ट्यांना बोलावले नाही. त्याच्यासारख्या मुव्ही माफियांमुळे इंडस्ट्रीतील अनेकांवर अन्याय होतोय, अशा आशयाचा आरोप तिने केला होता. कंगनाच्या या आरोपानंतर सोशल मीडियावर ‘बॉयकॉट करण जोहर’चा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. अनेकांनी करण जोहर व त्याच्या गँगवर तोंडसुख घेतले होते. सोशल मीडियावर करणच्या लोकप्रियतेचा ग्राफ वेगाने खाली आला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर सुमारे 5 लाख लोकांनी करणला अनफॉलो केले आहे.