निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरी गेल्या वर्षी झालेली पार्टी आणि या पार्टीच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून नारकोटिक्स कन्ट्रोल ब्यूरो (एनसीबी)ने करणला समन्स बजावला आहे. या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल होताच, सोशल मीडियावर खळबळ माजली होती. या पार्टीत ड्रग्जचा वापर झाल्याचा आरोप केला गेला होता अकाली दलाचे नेते मनजिंदरसिंग सिरसा यांनी यानंतर थेट एनसीबीकडे तक्रार केली होती. आता याच पार्श्वभूमीवर एनसीबीने करणला नोटीस बजावले आहे. या नोटीसनंतर काय तर करण जबरदस्त ट्रोल होत आहे. ट्विटरवर तर ‘कॉफी विद एनसीबी’ ट्रेंड करू लागले आहे. सोबत मजेदार मीम्सचाही सोशल मीडियावर पूर आला आहे.
काय म्हणाले ट्रोलर्स...आता एक नवा शो लवकरच सुरु होतोय. नाव, कॉफी विद एनसीबी, असे एका युजरने लिहिले आहे. अन्य एका युजरनेही असेच लिहित, करणला ट्रोल केले आहे.
‘कॉफी विद एनसीबी, हा करण जोहरच्या बकवास शोपेक्षा खूप मजेदार होणार,’असे या युजरने लिहिले आहे. ‘तू कितीही पॉवरफुल असशील, पण लक्षात ठेव, एक दिवस सर्व पापांचा हिशेब द्यावाच लागतो,’ अशा शब्दांत एका युजरने करणला सुनावले आहे.
एनसीबीने नोटीस बजावल्यानंतर आता करण जोहरला या पार्टीबद्दलचे सर्व तपशील एनसीबीला द्यावेच लागणार आहेत. पार्टीत कोण- कोण हजर होते? कोणत्या कॅमे-याने व्हिडिओ शूट केला? अशाप्रकारचे डिटेल्स करणला द्यावे लागणार आहेत. तथापि अद्याप एनसीबीने करणला चौकशीसाठी बोलावले नाही.
करण जोहरच्या घरी गेल्यावर्षी ही पार्टी झाली होती...
दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, वरूण धवन, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, विकी कौशल, शाहिद कपूर असे अनेकजण या पार्टीला हजर होते. करणने स्वत: या पार्टीचा व्हिडीओ शेअर केला होता आणि हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सनी या सेलिब्रिटींना ट्रोल करणे सुरु केले. व्हिडीओत सर्व स्टार्स ज्या स्थितीत दिसत आहेत, त्यावरून ते सगळे नशेत तर्र असल्याचे युजर्सने म्हणणे होते़ व्हिडीओत अभिनेता विकी कौशलला पाहून तर त्याने ड्रग्ज घेतली असावी, अशी शक्यता युजर्सनी व्यक्त केली होती. यानंतर सोशल मीडियावर विकी कौशलला चाहत्यांच्या तीव्र संतापाचा सामना करावा लागला होता. अनेकांनी विकी कौशलचा फोटो शेअर करून विकी दारूच्या नशेत आहे की ड्रग्जच्या असा प्रश्न उपस्थित केला होता. कॅमेरा समोर येताच विकी आपले नाक स्वच्छ करताना दिसतो, यावरून अनेकांनी तो ड्रग्जच्या नशेत असल्याचा दावा केला होता. या व्हिडिओबद्दल करणने अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले होते. पार्टीमध्ये ड्रग्स वापरले गेले नसल्याचे त्याने स्पष्ट केले होते.