सध्या नैराश्य म्हणजेच डिप्रेशनबद्दल मोकळेपणाने बोललं जात आहे. डिप्रेशन हा सुद्धा एक गंभीर आजार असून त्याच्यावर उपचार घेणं तितकंच गरजेचं आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणने स्वत: डिप्रेशनचा सामना केला आहे. नुकतंच 'कॉफी विद करण' मध्ये करण जोहरने (Karan Johar) काही दिवसांपूर्वीच नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाला त्याला आलेल्या पॅनिक अॅटॅकचा अनुभव सांगितला. शोमध्ये सहभागी झालेले रणवीर सिंह-दीपिकाही हे ऐकून धक्का बसला.
एप्रिल महिन्यात मुंबईमध्ये नीता अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन झालं. यावेळी अनेक बॉलिवूडच नाही तर हॉलिवूड सेलिब्रिटीही सहभागी झाले होते. याच इव्हेंटवेळी करण जोहरला पॅनिक अॅटॅक आला होता. हे ऐकून रणवीर सिंहलाही धक्का बसला. कारण रणवीर सिंह दीपिका अनेक सेलिब्रिटी त्या दिवशी उद्घाटनाला भेटले होते. करण म्हणाला,'मला आठवतंय वरुण धवनचं माझ्याकडे लक्ष गेलं होतं. मला खूप घाम येत होता. नक्की काय होतंय हे मला कळतंच नव्हतं. वरुण माझ्याजवळ आला, त्याने हात पकडला आणि मला ठिक आहेस ना असं विचारलं. माझे हात थरथरत होते. '
करण पुढे म्हणाला,'वरुणने मला एका खोलीत नेल. तिथे मी मोठा श्वास घेतला. श्वासाचे व्यायाम केले. वरुणला वाटलं मला हार्टअॅटॅकच आलाय. मी माझं मोठं जाड जॅकेट काढलं आणि अर्ध्या तासातच मी इव्हेंटमधून निघालो. घरी येऊन थेट मी बेडवर पडलो आणि खूप रडलो. मला का रडू येतंय हेच मला कळत नव्हतं. नंतर मी माझ्या थेरपिस्टकडे गेलो आणि त्याने मला मेडिकेशन दिले. आता मी ठीक आहे.'
हे असं का झालं असेल याचंही कारण सांगत करण म्हणाला, 'मला वाटतं कोरोनाचे तीन वर्ष, त्यानंतर सततचं ट्रोलिंग यानंतरही मी खूप स्ट्राँग असल्याचं दाखवत होतो. दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होतो. मलाच कळलं नाही मी किती मेहनत घेत होतो.'