सिने दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने शुक्रवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं. त्या पत्राच्या माध्यमातून करणने सांगितले की, तो आणि संपूर्ण इंडस्ट्री देशाची संस्कृती, त्याचा महान इतिहास आणि शौर्यावरर अनेक सिनेमे बनवणार आहे. करणनुसार, संपूर्ण बॉलिवूड स्वातंत्र्याचे ७५ वर्षे मोठ्या धडाक्यात साजरे करणार आहेत.
काय लिहिलं पत्रात?
करणने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींना बॉलिवूडच्या या नव्या मोहिमेबाबत विस्तारात सांगितले. करणने ट्विटमध्ये लिहिले की, पंतप्रधान मोदीजी आम्हाला अभिमान आहे की, जेव्हा स्वातंत्र्याचं ७५ वं वर्ष साजरं केलं जाणार आहे तेव्हा आम्ही या महान देशावर कथा सांगणार आहोत. आपल्या या पोस्टमध्ये करणने एक स्पेशल नोटही शेअर केलीय. त्यात त्याने बॉलिवूड कोणत्या दिशेने पुढे जाणार हेही सांगितलं आहे.
नोटमध्ये लिहिले आहे की, ‘Change Within’ मोहीम अंतर्गत फिल्म इंडस्ट्री एकत्र येऊन अशा कथा दाखवणार आहे ज्यातून देशाची संस्कृती, त्याचं शौर्य दाखवलं जाईल. कथांनीच आम्हाला बनवलं आहे आणि या देशाच्या काना-कोपऱ्यात अशा अनेक कथा आहेत ज्या प्रेरणा देतात. गेल्यावर्षी महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीला राजकुमार हिराणी यांनी एक सिनेमा बनवला होता. आता आम्ही पुन्हा स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी एका चांगल्या मोहिमेत एकत्र येत आहोत. तसेच या नोटमध्ये लिहिले आहे की, संपूर्ण देशाला पंतप्रधान मोदी यांच्याकडून प्रेरणा मिळते.
दरम्यान, करण जोहरसोबतच या मोहिमेत एकता कपूर, राजकुमार हिराणी, रोहित शेट्टी, साजिद नाडीयाडवालासारखे दिग्गज फिल्ममेकर असतील. करणने या सर्वांकडून पंतप्रधान मोदी यांना हे पत्र लिहिलंय. आता या मोहिमेच्या घोषणेनंतर आशा केली जाऊ शकते की, येणाऱ्या काही वर्षात तानाजीसारखे आणखी काही सिनेमे बघायला मिळतील.