बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येने बॉलिवूडमधील वातावरण ढवळून निघाले आहे. सुशांतने डिप्रेशनमधून आत्महत्या केल्याचे मानले जात आहे. पण काहींच्या मते, सुशांत बॉलिवूडमधील नेपोटिझमचा बळी ठरला. या पार्श्वभूमीवर कंगना राणौतने थेटपणे करण जोहरवर आरोप केले होते. करण जोहरने कधीच सुशांतला आपल्या पार्ट्यांना बोलावले नाही. त्याच्यासारख्या मुव्ही माफियांमुळे इंडस्ट्रीतील अनेकांवर अन्याय होतोय, अशा आशयाचा आरोप तिने केला होता. कंगनाच्या या आरोपानंतर सोशल मीडियावर ‘बॉयकॉट करण जोहर’चा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. अनेकांनी करण जोहर व त्याच्या गँगवर तोंडसुख घेतले होते. सोशल मीडियावर करणच्या लोकप्रियतेचा ग्राफ वेगाने खाली आला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर सुमारे 5 लाख लोकांनी करणला अनफॉलो केले आहे.
बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्यावर सतत ट्रोल होत असूनही करणने चुप्पी साधली आहे. गेल्या काही दिवसांत करणची प्रतीमा प्रचंड खराब झाली आहे. कधी काळी करणला फॉलो करणारे त्याला अनफॉलो करत आहेत. गेल्या दोन आठवड्यात त्याला अनेकांनी इन्स्टावर अनफॉलो केले आहे. आता त्याचे 1 कोटी 4 लाखांवर फॉलोअर्स आहेत. आधी हा आकडा 1 कोटी 10 लाखांवर होता.
सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर करणने एक पोस्ट शेअर केली होती. ‘गेल्या वर्षभरापासून मी तुझ्या संपर्कात नव्हतो. मीच दोषी आहे. अशी चूक मी पुन्हा कधीही करणार नाही़,’असे करणने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले होते. त्याची ही पोस्ट वाचूनच नेटकरी भडकले होते. नेपोटिझमला तूच खतपाणी घातलेस, आता इतका दिखावा करू नकोस, असे काय काय लोकांनी करणला या पोस्टनंतर सुनावले होते. करणसोबत त्याची सर्वाधिक आवडती आलिया भट हिचे फॉलोअर्सही कमी झाले आहेत. सलमान खानच्या फॉलोअर्सची संख्याही कमी झाली आहे.
एकीकडे करणचे फॉलोअर्स कमी झाले असताना कंगना राणौतच्या फॉलोअर्समध्ये मात्र वाढ होत आहे.कंगना राणौतने यापूर्वीही अनेकदा बॉलिवूडमधील नेपोटिझमला विरोध करण करण जोहरवर आरोप केले होते. सुशांतच्या मृत्यूनंतर नेपोटिझमवर बोलणारी ती पहिली व्यक्ती होती. तिची ही ठोस भूमिका पाहून अनेक लोक तिच्या प्रेमात पडल्याचे चित्र आहे.