काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत गाजलेला चित्रपट 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटाचा हिंदी रिमेक 'कबीर सिंग' प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर झळकला होता. या हिंदी रिमेकलाही प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक बनणं ही काय नवीन बाब नाही. 'कबीर सिंग'नंतर आता करण जोहरला देखील साऊथच्या चित्रपटाची भुरळ पडली आहे आणि तीदेखील विजय देवरकोंडाच्या चित्रपटाची. करण जोहरने या चित्रपटाचे राईट्स विकत घेतले आहेत.
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाचा नुकताच ‘डिअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन भारत कम्मा करत असून चित्रपटाचं कथानक एका विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आणि राज्य स्तरीय महिला क्रिकेटपटू यांच्यावर आधारीत आहे. या चित्रपटामध्ये विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे हक्क नुकतेच करण जोहरने विकत घेतले असून याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर दिली आहे.
दरम्यान, ‘डिअर कॉम्रेड’ या हिंदी रिमेकची घोषणा झाली असून काही दिवसापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘कबीर सिंग’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटामध्ये एक साम्य आहे. या दोन्ही चित्रपटातील अभिनेता तापट स्वभावाचा दाखविण्यात आला आहे. तसेच डिअर कॉम्रेड चित्रपटातील किसिंग सीनमुळे चर्चेत आला होता.