सध्या 'केसरी २' सिनेमाची (kesari 2 movie) निर्मिती केल्यामुळे करण जोहर (karan johar) चांगलाच चर्चेत आहे. हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असून प्रेक्षक आणि समीक्षकांंचं प्रेम मिळवत आहे. अशातच 'केसरी २' नंतर करण जोहरने त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केलीय. या सिनेमाच्या माध्यमातून करण पहिल्यांदाच प्रेक्षकांना सापांच्या अनोख्या दुनियेची सफर घडवणार आहे. 'नागझिला' (naagzilla movie) असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात बॉलिवूड सुपरस्टार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
हा अभिनेता 'नागझिला' सिनेमात साकारणार प्रमुख भूमिका
'नागझिला' सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज झालं असून बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन या सिनेमात झळकणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे मीडिया रिपोर्टनुसार 'नागझिला' सिनेमात कार्तिक दुहेरी भूमिकेत झळकणार आहे. यानिमित्ताने कार्तिक पहिल्यांदाच डबल रोलमध्ये दिसणार असून तो या चित्रपटात नायक आणि खलनायक दोन्ही भूमिका साकारेल. चित्रपटाचे दिग्दर्शन मृगदीप सिंग लांबा करत असून या सिनेमाची निर्मिती करण जोहर आणि महावीर जैन यांनी केली आहे.
कधी रिलीज होणार 'नागझिला'?
'नागझिला' या चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबर २०२५ मध्ये सुरू होणार असून पुढील वर्षी नागपंचमीच्या मुहुर्तावर अर्थात १४ ऑगस्ट २०२६ रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. 'नागझिला' हा चित्रपट साप आणि माणसाच्या संघर्षावर आधारित विनोदी कथा आहे, ज्यात कार्तिक आर्यन दोन परस्परविरोधी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. या सिनेमात कार्तिकची जोडी कोणत्या अभिनेत्रीसोबत दिसणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.