बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) स्वत:च केलेल्या एका विधानामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. मला अनुष्का शर्माचं (Anushka Sharma) करिअर उद्धवस्त करायचं होतं असं तो नुकतंच एका सार्वजनिक कार्यक्रमात म्हणाला. तर दुसरीकडे प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) बॉलिवूडची पोलखोल करत तिला इंडस्ट्रीत कॉर्नर केले जात होते असा खुलासा केला. त्यावरुनही अनेकांनी करण जोहरवर टीका केली. या सर्व चर्चांवर करणने प्रत्युत्तर दिले आहे.
सततच्या टीकेला कंटाळून करण जोहरने इन्स्टाग्रावर एक स्टोरी शेअर केली आहे. कवितेच्या माध्यमातून त्याने टीकाकारांना हे उत्तर दिलंय. त्याने लिहिले,'लगा लो इल्जाम.... हम झुकने वालों में से नहीं, झूठ का बन जाओ गुलाम, हम बोलने वालों में से नहीं, जितना नीचा दिखाओगे, जितना आरोप लगाओगे, हम गिरने वालों में से नहीं, हमारा कर्म हमारी विजय है, आप उठा लो तलवार, हम मरने वालों में से नहीं।'
(करा आरोप..मी झुकणार नाही, खोट्या गोष्टींवरच विश्वास ठेवा...मी बोलणाऱ्यातला नाही, जितकं कमी लेखाल, जितके आरोप कराल, मी पडणारा नाही, आपले कर्मच आपला विजय आहे..तलवार उचला...मी मरणारा नाही.)
करण जोहरने गेल्या वर्षीच टीकेला कंटाळून ट्वीटर अकाऊंट कायमचे बंद केले. मात्र तरी सोशल मीडियावर त्याच्यावर होणारी टीका थांबत नाही. इन्स्टाग्रामवर त्याने या टीकाकारांना उत्तर दिलं असलं तरी तो त्यावरुनही ट्रोल होत आहे. करण जोहरवर बॉलिवूडमध्ये नेपोटिझम आणि गटबाजी करण्याचा आरोप आहे. तो केवळ स्टारकिड्सना संधी देतो आणि इतरांचं करिअर होऊ देत नाही अशी त्याच्यावर टीका होते. गेल्या काही दिवसांपासून करण ट्रोलर्सच्या निशाण्यावरच आहे.